घरक्रीडामलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

श्रीकांत, सिंधूची विजयी सलामी; सायना पराभूत

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. महिलांमधील स्टार खेळाडू सायना नेहवाल तसेच एच. एस. प्रणॉय यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी भारतीय जोडी मनू अत्री आणि सुमित रेड्डी यांचाही पराभव झाला आहे.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानी असलेल्या जपानच्या अया ओहोरीचा २२-२०, २१-१२ असा पराभव केला. हा सिंधूचा ओहोरीवरील सहावा विजय होता. या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये ओहोरीने सिंधूला चांगली झुंज दिली. या गेममध्ये ओहोरीकडे १२-७ अशी आघाडीही होती. मात्र योग्य वेळी चांगला खेळ करत सिंधूने हा गेम २२-२० असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये ओहोरीला चांगला खेळ करता आला नाही आणि तिने सामना गमावला. आता सिंधूचा दुसर्‍या फेरीत कोरियाच्या सुंग जी ह्युनशी सामना होणार आहे. सुंगने सिंधूचा ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पराभव केला होता. पहिल्या फेरीत सायना नेहवालवर थायलंडच्या पोर्नपावी चोचुवॉन्गने २२-२०, १५-२१, १०-२१ अशी मात केली.

- Advertisement -

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत किदाम्बी श्रीकांतने इंडोनेशियाच्या एहसान मौलाना मूस्तोफाला २१-१८, २१-१६ असे पराभूत केले. श्रीकांतच्या पुढील फेरीत थायलंडच्या खोसीतशी सामना होईल. इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणार्‍या एच. एस. प्रणॉयचा थायलंडच्या सिथिकोम थम्मासिनने २१-१२, १६-२१, १४-२१ असा पराभव केला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी समीर वर्माचाही पराभव झाला होता. त्यामुळे आता पुरुष एकेरीत श्रीकांत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमित रेड्डी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा सातव्या सीडेड हान चेंगकाय आणि झोऊ हाओडाँग या चिनी जोडीने २१-१६, २१-६ असा धुव्वा उडवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -