घरमुंबईLok Sabha 2024 : सरड्याची धाव कुंपणापर्यंत..., कुटुंब वादावर भाजपाचे शरद पवारांना...

Lok Sabha 2024 : सरड्याची धाव कुंपणापर्यंत…, कुटुंब वादावर भाजपाचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Subscribe

पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबीयांची स्थिती चिंताजनक नाही. उलटपक्षी आता मोदी यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सक्षम आणि आत्मनिर्भर होत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना कुटुंबाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे, असे शरद पवार यांनी आज, शनिवारी सांगितले. त्यावरून महाराष्ट्र भाजपाने ट्वीट करत शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आपले लक्ष महाराष्ट्रावर केंद्रीत केले आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला अलीकडेच दिलेल्या विशेष मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या घरातील वादाला राजकीय असून, महाराष्ट्रातील जनतेला हे पटणार नाही. राजकीय वारसा काम करणाऱ्या पुतण्याचा आहे की, मुलीला द्यायचा, हा वाद आहे आणि तो पूर्णपणे कौटुंबिक आहे. त्यामुळे सहानभूती नव्हे तर, संतापाचे वातावरण आहे. या वयात जर कुटुंबाला ते सांभाळू शकत नसतील तर, महाराष्ट्राला कसे सांभाळतील? असा प्रश्न त्यांनी विचारला.

- Advertisement -

त्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. मलाही मोदी यांच्याबद्दल माहिती असून त्यांनीदेखील कुठे कुटुंब सांभाळले? त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. तथापि, कोणाबाबतही व्यक्तिगत बोलू नये, हे पथ्य पंतप्रधानांनी पाळले नसले तरी, आपण ते पाळणार असल्याचे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

यावरून महाराष्ट्र भाजपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांचे कुटुंब आपल्या विचारांच्या कक्षेबाहेरचे आहे, हे शरद पवार यांनी लक्षात घ्यावे. 140 कोटी जनता हेच मोदी यांचे कुटुंब आहे. सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतली असून गेली 10 वर्षं कुटुंबप्रमुख म्हणून ते केवळ आपले कर्तव्यच बजावत नाहीत तर, त्यांनी जागतिक पातळीवर आपल्या कुटुंबाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे, असे भाजपाने म्हटले आहे.

शरद पवार यांचा कुटुंबवत्सलपणा उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. ‘हम दो आणि हमारी एक’ म्हणत त्यांनी पुतण्याचे कर्तृत्वही नाकरले होते. त्यामुळे ते म्हणतात तशी मोदी यांच्या कुटुंबीयांची स्थिती चिंताजनक नाही. उलटपक्षी आता मोदी यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सक्षम आणि आत्मनिर्भर होत आहे. त्यामुळे काळजी नसावी, असा सल्लाही भाजपाने दिला आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election : दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानेच मोदींबद्दल आस्था कमी – शरद पवार


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -