घरमुंबईकाँग्रेसच्या दोन आणि भाजपच्या चार नगरसेवकांवर टांगती तलवार

काँग्रेसच्या दोन आणि भाजपच्या चार नगरसेवकांवर टांगती तलवार

Subscribe

नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले नाही अशा नगरसेवकांचे पद आपोआप रद्द होते. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचा फटका इतर महापालिकांप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेमधील नगरसेवकांना बसला आहे. या निकालामुळे मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या दोन व भाजपच्या चार अशा एकूण सहा नगरसेवकांना आपल्या पदावर पाणी सोडावे लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी लढवताना उमेदवाराने जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्यास ‘महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल अ‍ॅक्टच्या कलम ९ अ’ नुसार निवडून आलेल्या नगरसेवकाने ६ महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे नगरसेवक सहा महिन्यात असे प्रमाणपत्र सादर करत नाहीत, त्यांचे पद आपोआप रद्द होते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांसंबंधी दिला आहे. यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील तब्बल २० नगरसेवकांची पदे रद्द झाली आहेत. या निर्णयाचा फटका मुंबई महापालिकेतील एकूण आठ नगरसेवकांना बसला असता. मात्र त्यामधील दोन नगरसेवकांचे पद लघुवाद न्यायालयाने आधीच रद्द केले आहे. यामुळे आता उर्वरित सहा नगरसेवकांना या निर्णयाचा फटका बसेल अशी शक्यता पालिकेच्या अधिकार्‍याने वर्तवली आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली. पालिकेच्या २२७ पैकी ८ नगरसेवकांनी बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केली होती. त्यापैकी शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी व शिवसेनेचे सगुण नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिल्याने या दोघांचे नगरसेवकपद रद्द झाले. तर प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा, प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे राजपती यादव, प्रभाग क्रमांक ६७ मधील भाजपाच्या सुधा सिंग, प्रभाग क्रमांक ८१ मधील भाजपचे मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ७६ मधील भाजपच्या केशरीबेन पटेल तसेच प्रभाग क्रमांक ७२ मधील भाजपचे पंकज यादव यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळले आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयाला सहाही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या नगरसेवकांचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असले तरी आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे या सहाही नगरसेवकांचे पद रद्द होऊ शकते, असे या अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisement -

१४ नगरसेवकांचे पद रद्द –

मुंबई महानगरपालिकेची मागील दोन निवडणुका लढवून नगरसेवक बनलेल्यांपैकी १४ जणांची पदे बाद झाली आहेत. यात जातीच्या बोगस प्रमाणपत्रांसह दोनहून अधिक अपत्ये असलेल्या नगरसेवकांचाही समावेश आहे. २००७ ते २०१२ या पाच वर्षाच्या काळात जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शिरीष चोगले, सुनील चव्हाण, लालजी यादव, रश्मी पहुडकर, नारायण पवार, प्रवीण देव्हारे, विश्वनाथ महाडेश्वर, सुभाष सावंत, अंजुमन असलम, सिमिंतीना नारकर, भारती घोंगडे या दहा नगरसेवकांना आपले पद सोडावे लागले आहे. २०१२ ते २०१७ या पाच वर्षाच्या काळात जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अनुषा कोडम, भावना जोबनपुत्रा, मोहमद इसाक यांना तर दोनहून अधिक अपत्ये असल्याने सिराज शेख यांना आपले पद सोडावे लागले आहे.

यांचे पद धोक्यात
प्रभाग क्र. ९० – ट्युलिप मिरांडा (काँग्रेस)
प्रभाग क्र. २८ – राजपती यादव (काँग्रेस)
प्रभाग क्र. ६७ – सुधा सिंग (भाजप)
प्रभाग क्र. ८१ – मुरजी पटेल (भाजप)
प्रभाग क्र. ७६ – केशरीबेन पटेल (भाजप)
प्रभाग क्र. ७२ – पंकज यादव (भाजप)

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -