घरमुंबईपर्यटकांसाठी मुंबई सेन्टर पॉईंट

पर्यटकांसाठी मुंबई सेन्टर पॉईंट

Subscribe

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फूल टू धम्माल... पण ही धमाल करण्याबरोबरच थोडेस ज्ञानही मिळाल्यास अधिकच फायदेशीर असते. मुलांना सुट्टीमध्ये अशा ठिकाणी नेण्याकडे पालकांचा कल असतो की तेथे मुलांना मौजमजेबरोबरच काही ज्ञानही मिळेल. मुंबईत अशी अनेक ठिकाणे आहेत. जी मुलांच्या मौजमजेसोबत त्यांना ज्ञानही मिळवून देणारी आहेत. लहान मुलांना आणि मोठ्यांना आकर्षणाचे स्थळ कुठे आहे? तेथे नेमके कशाप्रकारे जायचे?आणि कसे असेल ते ठिकाण? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. मुंबईतील ज्ञानाबरोबरच आनंद मिळवून देणारी ठिकाणांची माहिती ‘आपलं महानगर’ने उपलब्ध केली आहे. जिथे तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत मस्त एन्जॉय करू शकता ....

TARAPORWALA MATSALAY

तारापोरवाला मत्स्यालय
१९२३ साली बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक मिलार्ड यांनी मांडली. मुद्रातील अद्भूतरम्य जग लोकांना पहायला मिळावे, या हेतूने मरीन ड्राईव्हला १९५१ मध्ये तारापोरवाला मत्स्यालय बांधण्यात आले. मत्स्यालयात भारतातच नव्हे तर सिंगापूर, मलेशिया, चीन, हाँगकाँग आणि बँकॉक येथून आणलेले मासे पहायला मिळतात. निळे, पिवळे, काळे, केशरी, पांढरे, काळ्या ठिपक्यांचे व झेब्रासारखे दिसणारे पट्टेरी मासे तसेच काही भले मोठे तर काही इवलेसे मासे येथे पहायला मिळतात. मत्स्यालयात जवळपास २५० जातीचे विविध जातीचे, आकाराचे मासे आहेत. लक्षद्वीप बेटाच्या परिसरातून आणलेले सात प्रकारच्या प्रवाळ माश्यांसह समुद्र आणि गोड्या पाण्याच्या माश्यांच्या १०० प्रजाती येथे पहायला मिळतात. तारापोरवाला मत्स्यालयाला चर्नीरोड स्थानकात उतरून जाता येते. मत्स्यालय सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते. रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असते. मत्स्यालय प्रवेश शुल्क लहानांसाठी (६ ते १६ वर्षांच्या आत)- 20 रुपये तर प्रौढांसाठी 30 रुपये इतके आहे.

Hanging Garden

हँगिंग गार्डन 
मलबार हिल येथे वसलेल्या हँगिंग गार्डनमधील बालकांपासून ते वृध्दांपर्यंतचे आवडते ठिकाण म्हणजे म्हातारीचा बूट. 20 फूट उंच असलेल्या बुटातून मुंबईचे दर्शन घडते. म्हातारीचा बूट असलेल्या हँगिंग गार्डन्सची अर्थात कमला नेहरू पार्क आणि फिरोजशहा मेहता गार्डन अशी दोन उद्याने आजुबाजूला आहेत. एका उद्यानाला भेट दिल्यावर दुसर्‍या उद्यानाला भेट न देणारा माणूस विरळा. कारण या दोन्ही उद्यानांनी आपले स्वत:चे असे वैशिष्ट्य जपले आहे. म्हातारीच्या बुटातून मुंबई दर्शनाचा नक्कीच अनुभव घ्या. हँगिग गार्डनला जाण्यासाठी चर्नीरोडला उतरून चालत जाता येते.

- Advertisement -
Priyadarshini Park

प्रियदर्शनी पार्क
मुंबईतील नेपिअन सी रोड लगत असणार्‍या उंच उंच इमारती, समुद्रकिनारा व नारळाच्या झाडांच्या रांगेत असलेला विस्तीर्ण हिरवागार भूप्रदेश म्हणजे प्रियदर्शनी पार्क आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. २० एकर परिसरात वसलेले हे पार्क पीडीपी या नावाने ओळखले जाते. पार्कमध्येच अ‍ॅथलेटिक ग्राऊंडबरोबरच चार टेनिस कोर्ट, फुटबॉल, कराटे खेळायला जागा आहे. त्याचबरोबर जवळपास जॉगर्स पार्क व जॉगिंग ट्रॅक, तसेच झाडाझुडपांच्या मध्यभागी असलेले गवताचे लहान मोठे उंचवटे व त्या उंचवट्यावर बसल्यावर समोर दिसणारा खळखळणारा समुद्र आणि त्यातील मोठमोठाले दगड ही या पार्कची शानच म्हणावी लागेल. पार्कला भेट देण्यासाठी ग्रँट रोड स्थानक किंवा दादर बस स्थानकावरून जाऊ शकता. प्रियदर्शनी पार्क हे सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ४.३० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असते.

Sanjay Gandhi National Park

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 
मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. यालाच नॅशनल पार्क असेही म्हणतात. १०४ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले हे जंगल ४० वर्षांपासून हौशी पर्यटकांचे मन तृप्त करत आहे. दरवर्षी जवळपास २० लाख पर्यटक येथे भेट देतात. या जंगलात वन्य प्राण्यांचा संचार असल्याने काही भागात पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. हरीण, माकड, सर्प, बिबट्या यांसारखे वन्य प्राणी अजूनही आढळतात. सरकारतर्फे व्याघ्र प्रकल्प राबवला जात असून, वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलसफारीचीही सोय उपलब्ध आहे. उद्यानामध्ये सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी प्रौढांना २० रुपये तर लहान मुलांना १० रुपये प्रवेशशुल्क आहे. पर्यटकांच्या वाहन थांब्यासाठी शुल्क आकारले जाते. उद्यानात वननिवासाची सोय असून, त्यासाठी विश्रामगृह आणि कुटीर पद्धतीच्या निवासाची व्यवस्था आहे. बोरीवली रेल्वेस्थानकात उतरून येथे बस किंवा रिक्षाने जाता येते.

- Advertisement -
Gateway of India

गेटवे ऑफ इंडिया
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील प्रवेशद्वार म्हणून गेटवे ऑफ इंडियाची ओळख आहे. भारतभेटीला आलेल्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिश सरकारने गेटवेच्या इमारतीची उभारणी केली. वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेले गेट वे ऑफ इंडियाची इमारत १९२४ पासून पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिदू ठरत आहे. मुंबई शहराच्या सम्रुद्र किनार्‍यालगत असलेली कमानवजा इमारत असून, अपोलो बंदराच्या भागात असलेली २६ मीटर उंच वास्तू आहे. या वास्तूसमोर छायाचित्र काढण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. निव्वळ २० ते ५० रुपये आकारून हे फोटो काढून दिले जातात. चर्चगेट व सीएसएमटी येथे उतरून बस किंवा टॅक्सीने येथे जाता येते.

Dr. Bhau Daji Lad Museum

डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम
मुंबईची संस्कृती समजून घ्यायची असेल, तर भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची भेट महत्त्वाची आहे. पर्यटकांच्या दृष्टीने मुंबईमधील महत्त्वाच्या ठिकाणांच्या यादीमध्ये पहिल्या पाचमध्ये डॉ. भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाचा समावेश आहे. १५८ वर्षे जुने असलेले हे वस्तूसंग्रहालय भायखळ्यातील जिजामाता उद्यानजवळ आहे. मुंबईच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देणार्‍या अनेक कलावस्तू व ग्रंथ या संग्रहालयात आहेत. १८३२ मध्ये पॅलेडियन वास्तुशैलीत इमारतीचे बांधकाम झाले असून, वस्तूसंग्रहालयाचे नक्षीदार खांब, त्याच्या छतावरील नक्षीकाम तसेच अन्य कलाकुसर बघण्यासारखी आहे. नयनरम्य अशा वास्तूमध्ये भूतकाळाचा वेध घेताना आपण भान हरवून बसतो. डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत सुरू असते. बुधवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असते. म्युझियमचे प्रवेश शुल्क पाच ते 15 वर्षे : ५ रुपये, विद्यार्थ्यांसाठी : २ रुपये आणि प्रौढांसाठी : १० रुपये इतके आहे.

Elephanta Caves

एलिफंटा केव्ह्ज
घारापुरीची लेणी उर्फ एलिफंटा गुफा ही महाराष्ट्रामधील मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स. ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडातील आहेत. १९८७ साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला. मुंबई दर्शनमधल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ असले तरी हे स्थळ मुंबईपासून 10 किमी अंतरावर समुद्रात आहे. घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणीला नक्कीच भेट द्या. गुंफामध्ये कोरलेल्या भव्य हत्ती व प्राचीनकालीन शिवकालीन लेणी पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोट दर तासाला सुटतात. या फेरी बोटींचा प्रवास सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असून, या बोटीतून प्रवास करण्यासाठी ८० ते १२० रुपये पर्यंत तिकीट आकारले जाते.

Mahakali Caves

महाकाली लेणी
महाकाली लेणी या कोंडीवटी या नावाने ओळखले जातात. या लेणी मुंबईतील आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वसलेल्या आहेत. ही डोंगरावरील लेणी पूर्वेला 15 व पश्चिमेला चार अशी दोन भागात आहेत. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे. या गुंफांतील स्तुपांचा आकार शिवलिंगासारखा वाटल्याने, त्यांना महाकाळ असे म्हटले गेले आहे. महाकाली गुफांच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले महाकालीच्या मंदिरावरून या लेण्यांना महाकाली हे नाव पडले आहे. लेण्यांमध्ये बुद्धांच्या लेण्या आहेत. आपल्याला यामध्ये बुद्धाच्या एकूण १९ लेण्या आणि विविध स्तूपही पहायला मिळतात. अंधेरी स्थानकावरून बस व रिक्षाने आपण या लेण्यांपर्यंत पोहोचू शकतो.

बेस्ट संग्रहालय
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील स्थानिक वाहतुकीचा एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे ‘बेस्ट उपक्रम’. १८७४ पासून ते १९६० पर्यंतचा बेस्टचा इतिहास प्रभावीपणे मांडणारे वस्तुसंग्रहालय १९८३ पासून कार्यरत आहे. हे वस्तुसंग्रहालय कुर्ला व शीव स्टेशनपासून जवळ असणार्‍या आणिक डेपोच्या आवारात कार्यरत आहे. मुंबईतील स्थानिक प्रवासी वाहतूक व विद्युत पुरवठा या दोन महत्त्वाच्या सेवांबाबत अनेक पुरातन वस्तू, माहिती, दस्तऐवज, चल प्रतिकृती, स्थिर प्रतिकृती, छायाचित्रे इत्यादी बाबी या संग्रहालयात पहावयास मिळतात. घोड्यांनी ओढली जाणारी ट्राम, अमेरिकन ट्रेलर ट्राम, स्कोडा कंपनीची विद्युत ट्रॉली बस, ट्रामची व बसची जुनी तिकिटे, तिकिटे देणारी विविध प्रकारची यंत्रे यासारख्या अनेक बाबी या संग्रहालयात आकर्षकपणे मांडण्यात आल्या आहेत. बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील विविध प्रकारची विद्युत मीटर, विद्युत स्वीच गेअर, सर्किट ब्रेकर, गॅसवर चालणारा जुना पथदिवा, दिवे दुरुस्त करण्याचा हॅण्ड टॉवर, विद्युत देयकांची यंत्रे, कार्यालयीन कामाकाजासाठी वापरली जाणारी जुनी गणकयंत्रे यासारख्या अनेक दुर्मीळ वस्तूदेखील या संग्रहालयात आहेत. हे संग्रहालय पाहण्यासाठी कसलेही शुल्क आकारण्यात येत नाही.

Rajbhai Tower

राजाभाई टॉवर
मुंबई विद्यापीठाची मुख्य इमारत म्हणून राजाभाई टॉवर ही इमारत उभी आहे. १४३ वर्ष जुनी इमारत पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून ही वास्तू उभारण्यात आली आहे. या टॉवरच्या बांधकामात बेनेटीयन आणि गोथिक या वास्तूकलेचा मिलाप आढळून येतो. याच्या बांधकामासाठी कुर्ला येथील खाणीतील फिक्या पिवळ्या रंगांच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. राजाभाई टॉवर हा त्यावर असलेल्या घड्याळ्यामुळेही ओळखला जातो. चर्चगेट व सीएसएमटी रेल्वेस्थानकातून चालत जाता येते.

Veer Jijabai Bhosale Park

वीर जिजाबाई भोसले उद्यान
वीर जिजाबाई भोसले उद्यान (राणीचा बाग) ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून, ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. मुंबईतील इतर कुठल्याही उद्यानात इतके विस्मयकारक वनस्पती-वैविध्य सापडत नाही. येथील कित्येक वृक्षांनी शंभरी पार केलेली आहे. विशेष म्हणजे या राणीच्या बागेत पेंग्विनसुद्धा पहायला मिळतो. राणीच्या बागेत जाण्यासाठी भायखळा स्थानकात उतरून चालत जाता येते. राणीची बाग सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू असते. राणी बागेत प्रवेश शुल्क लहान मुलांसाठी २५ रुपये तर प्रौढांसाठी ५० रुपये इतके आहे.

Nehru Tarangan

नेहरू तारांगण
वरळीतील नेहरू तारांगण भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ओळखले जाते. १९७७ मध्ये ‘लाइट अ‍ॅण्ड साइट’ प्रदर्शनासह हे केंद्र सुरू झाले आणि १९७९ मध्ये तिथे एक सायन्स पार्क तयार करण्यात आले. ११ नोव्हेंबर १९८५ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले. नेहरू तारांगणमध्ये आकाशदर्शनाचा एक रोमांचक अनुभव घेता येतो. तारांगणात ग्रह-तार्‍यांची ओळख व इतर अवकाशातील माहिती आणि त्या व्यतिरिक्त अंतराळ संशोधनाचे विविध टप्पेही पहायला मिळतात. विविध तार्‍यांच्या नावाने इथे वजन काटे लावले असून, यावर उभे राहून वजन केल्यास त्या तार्‍यांवरील तुमचे वस्तुमान किती हे समजते. या केंद्रात १४ कार्यशाळा आहेत. येथे आपण दादर, भायखळा, महालक्ष्मी या स्थानकावरून बसने जाऊ शकता. नेहरू तारांगण सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असते. फक्त सोमवारी नेहरू तारांगण बंद असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -