घरमुंबईनालेसफाईच्या नावान...

नालेसफाईच्या नावान…

Subscribe

नजर महानगर

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नालेसफाईची कामे ७० टक्क्यांकहून अधिक पूर्ण केल्याचा दावा नुकताच केला, मात्र वस्तूत: मुंबईतील अनेक छोट्या-मोठ्या नाल्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. ज्या ठिकाणी नाल्यांची कामे पूर्ण झाली आहेत, त्याठिकाणी नाल्याच्या बाहेर गाळ तसाच पडून आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याची समस्या पुन्हा सुरू झाली आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा वेळी मुंबईतील नालेसफाईचा मुद्दा पुन्हा एकदा वादग्रस्त ठरणार असून या विषयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील नालेसफाईची नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबत दै. ‘आपलं महानगर’ने ‘नजर महानगर’च्या माध्यमातून घेतलेला हा सचित्र आढावा.

कुर्ला पूर्व-पश्चिम उपनगर
पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र उपनगरातील काही भागात दिसून येत असले तरी, काही भाग नालेसफाईपासून दूरच राहिला आहे. उपनगरातील कुर्ला पूर्व-पश्चिम विभागात अनेक ठिकाणी प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नालेसफाई पूर्णपणे होत नाही, तर काही ठिकाणी पावसाळा उलटूनही नालेसफाईला मुहूर्त लागत नसल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे नगर या ठिकाणी असलेला नाला हा थेट पूर्व पश्चिमेला जोडला गेला आहे. पावसाळ्यात हा नाला भरल्यामुळे आजूबाजूची वस्ती तसेच शेजारीच असलेल्या पोलीस ठाण्यात त्याचे पाणी येत असल्याच्या अनेक तक्रारी या ठिकाणी आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी आठवडा बाकी असताना देखील या नाल्याची साफसफाई करायला महापालिकेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. येथील स्थानिक नगरसेवक अश्रफ आझमी यांना याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी फोन उचलण्याचे कष्ट घेतले नाही. कुर्ला पूर्व येथील परिस्थिती वेगळी नाही. नेहरू नगर हा परिसर पावसाळ्यात नेहमी पाण्याखाली असतो, मात्र या ठिकाणी यंदा नालेसफाई सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वत्सलताई नाईक नगर येथील तानसा पाईप लाईन जवळ असलेल्या नाल्याजवळील झोपड्या हटवून नाल्याचे रुंदीकरण करण्यात आले, त्याच बरोबर येथील नाल्याची सफाई जेसीबीच्या साह्याने करण्यात आली आहे. या ठिकाणी यंदा पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता कमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

रेल्वे प्रशासनाच्या नालेसफाईचा कामांचा आढावा
मुंबईतील नालेसफाई केल्याच्या दावा माहापालिका प्रवाशांना करत असले. तरी आज वस्तुस्थिती वेगळी आहे. मुंबई शहरातील अनेक भागात नालेसफाई झालीच नाही. ज्या परिसरातील नालेसफाई झाली आहे. तिथल्या नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. चिंचपोकळी परिसरात नाल्यातील काढलेला गाळ तसाच नाल्याच्या बाजूला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी हा गाळ लवकर उचलला गेला नाही, तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे चिन्ह दिसून येत आहे. या परिसरातील वामनराव निमजे या वृद्ध व्यक्तीने दैनिक ‘आपलं महानगर’ला सांगितले कि, या परिसरातील छोट्या आणि मोठ्या नाल्याचा गाळ प्रत्येक वर्षी मुंबई महानगर पालिकाकडून काढण्यात येतो. मात्र पावसाळा सुरु होताच काढलेला गाळ पुन्हा नाल्यात जात असल्यामुळे नाला चोकअप होतो. अनेकदा याबद्दल तक्रारी करून सुद्धा परिसरातील लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत.

रेल्वे मार्गावरील नाले बंदावस्थेत
दर वर्षी पावसाळ्यात रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीला येत असतो. रेल्वे प्रशासन नालेसफाई झाल्याचे गाजावाजा करत सांगत असते, मात्र मुंबईच्या रेल्वे मार्गावरील कित्येक नाल्यांची परिस्थितीत ‘जैसे थे’च आहे. रेल्वे प्रशासनाने नाल्यातून उपसलेला गाळ नाल्याच्या बाजुला तसाच ठेवलेला आहे. त्याची विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर हा कचरा पुन्हा नाल्यात जमा होणार आहे. रेल्वेचे नाले या प्रकारामुळे चोकअप होतात. त्याच्या परिणाम रेल्वे सेवेवर पडतो. रेल्वेचे मुख्यालय असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद स्थानक यादरम्यान असलेल्या नाल्याची सफाई करून त्यातील गाळ बाजुला जमा करण्यात आल्याने रेल्वेच्या नालेसफाईच्या कामावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माटुंगा, सायन, विक्रोळी, कांजूर मार्ग, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्टेशनाकडील नाल्यांची तर यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. रेल्वेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- Advertisement -

गाळ ठरतोय डोकेदुखी
मुंबईतील अनेक ठिकाणी छोट्या नाल्यांची सफाई पूर्ण झाली असली तरी त्यातील गाळ मात्र रस्त्याच्या किनार्‍यावर तसाच पडून राहिल्याचे चित्र प्रतीक्षा नगरपासून मुंबईतील अनेक ठिकाणी दिसून येत आहे. या गाळामुळे येथील स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असून या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे येथील रहिवाशांना तोंडावर रुमाल धरुनच आपला प्रवास पूर्ण करावा लागतो. त्याचबरोबर याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा वावर देखील वाढला आहे. त्यामुळे रहिवाशांप्रमाणे येथील प्राण्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. त्याचबरोबर या परिसरात इतर मोठे नाले देखील आहेत, त्यांची म्हणावी तशी स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे या परिसरात सध्या नालेसफाई डोकेदुखी ठरलेली आहे. मुळात ज्या ठिकाणी हा गाळ ठेवण्यात आलेला आहे. तेथून हाकेच्या अंतरावरच लोकवस्ती आहे. त्यामुळे त्यांच्या दिवसांची सुरुवात या घाणीच्या साम्राज्यात होत असल्याची खंत येथील रहिवाशांकडून करण्यात आलेली आहे. एका ठिकाणीच जर हा गाळ ठेवण्यात आला असता तर स्थानिकांना त्याचा फटका बसला नसता, अशी माहिती येथील रहिवाशांकडून देण्यात आली आहे. तर गाळ ठेवून एक आठवड्याहून अधिक काळ झालेला आहे, त्यानंतरही जर गाळ उचलला जात नसेल तर त्यावरुन महापालिका यावर किती गंभीर आहे, हे दिसून येत आहे.

मुंबईमध्ये सन २०१९-२० या वर्षाकरता मोठे नाले, मिठी नदी व छोट्या नाल्यांची सफाईची एकूण ४७ कंत्राटे देण्यात आली आहे. या कामांचा कालावधी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० असा आहे. या सर्व कामांना एप्रिलमध्ये सुरुवात झाली आहे. या सफाई कामांमध्ये सर्व नाले, नद्यांमधील तसेच रस्त्यालगतच्या नाल्यांमधील एकूण ३ लाख ४९ हजार ०५० मेट्रीक टन एवढा गाळ काढणे अपेक्षित आहे. त्यातील ७० टक्के म्हणजे २ लाख ४४ हजार ३३५ मेट्रीक टन एवढा गाळ पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मे २०१९ पर्यंत काढणे अपेक्षित आहे. पावसाळ्यात उर्वरीत १५ टक्के आणि पावसाळ्यानंतर १५ टक्के गाळ काढणे अपेक्षित आहे

पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार्‍या ७० टक्के नालेसफाईच्या ९९.०१ टक्के एवढे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मिठी नदीचे ९८.३६ टक्के तर मोठ्या नाल्यांची सफाई ९९.२६ टक्के एवढी सफाई झाली आहे. मिठी नदीसह मोठ्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ४ लाख ८५ हजार ४३० एकूण गाळाच्या तुलनेत ३ लाख ३९ हजार ८०१ गाळ काढायचा आहे. त्यातील आतापर्यंत ३ लाख ३६ हजार ४२८ गाळाची विल्हेवाट डम्पिंग ग्राऊंडवर लावण्यात आली आहे. केवळ मोठ्या नाल्यांमधून पावसाळा पूर्व २ लाख ४४ हजार ३३५ मेट्रीक टन गाळाच्या तुलनेत २ लाख ४२ हजार ५२९ मेट्रीक टन एवढ्या गाळाची विल्हेवाट डम्पिंग ग्राऊंडवर लावण्यात आली आहे.

सामान्यपणे नाल्यातून काढलेला गाळ सुकेपर्यंत गाळ नाल्यांच्या काठावर ठेवण्यात येतो. तसेच नाल्यालगतचा रस्ता अरुंद असेल तर स्थानिक रहिवाशांची गैरसोय होवू नये म्हणून तेथे गाळ काढून ठेवला जात नाही. सुकलेला सर्व गाळ हा वसई, भिवंडी, उरण, महापे, पनवेल इत्यादी ठिकाणी टाकण्यात येतात. कंत्राटातील अटींनुसार कंत्राटदाराने गाळाची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण शोधून त्याठिकाणी गाळ टाकायचा आहे. त्याप्रमाणे कंत्राटदार हे त्यांनी दिलेल्या जागेत हा गाळ टाकत असतात. सुरुवातील वजनकाट्याच्या समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे गाळ उचलण्यात विलंब होत असला तरी आता ही समस्या मिटली आहे. वाहून नेलेल्या गाळाचा अहवाल हा वजनकाट्यावर उपलब्ध संगणकीयकृत आकडेवारीवर आधारीत असल्याने त्याद्वारे अचूक आकडेवारी प्राप्त होत आहे.

नालेसफाई करतांना गाळ वाहून नेण्यात येणार्‍या डंपरने गाळ भरण्यापूर्वी, गाळ भरतांना व डंपर पूर्ण भरल्यानंतर फोटो घेण्यात येतात. तसेच व्ही.टी.एस.एसच्या प्रिंटआऊटवर गाडीचे गाळाने भरलेले आणि रिकाम्या डंपरचे वजन संगणकामार्फत नोंदवले जातात. त्याचप्रमाणे नाला साफ करण्यापूर्वी, साफ करताना आणि साफ केल्यानंतरचे फोटो काढले जातात.

आजार बळावण्याची शक्यता
मुंबईत पावसाळ्यापूर्वी अनेकदा नालेसफाई केली जाते. नालेसफाई केल्यानंतर नाल्यातील गाळ तसाच त्याठिकाणी ठेवला जातो. गाळ तसाच काढून ठेवल्यामुळे नाल्यांच्या शेजारी राहणार्‍या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असे डॉक्टर्स सांगतात. पहिल्यांदा तर गाळ तिथेच काढून ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. शिवाय गाळासोबत नाल्यातील पाणी ही रस्त्यावर पसरते. त्यातूनच लोकांना चालावे लागते. जर एखाद्या व्यक्तीच्या पायाला काही जखम झाली असेल आणि ती व्यक्ती त्या घाणेरड्या पाण्यातून चालत असेल तर पायांना संसर्ग होऊ शकतो. सोबतच लेप्टोस्पायरोसिस, पाण्याद्वारे होणारे आजार म्हणजेच जसे की कोलरा, गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू असे आजार देखील होऊ शकतात. त्या गाळ्यावर माशा बसून त्याच आपल्या जेवणावर बसल्या आणि ते अन्न खाल्ले तर पोटाचे विकार – पोट मळमळणे, जुलाब,उलटीचा त्रास होऊ शकतो. लहान मुलांना त्या दुर्गंधीमुळे सर्वात जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळेस लोकांनी तोंडावर रुमाल बांधावा. मगच त्या रस्त्यावरुन प्रवास करावा. शिवाय, ज्यांना जखम असेल त्यांनी त्या रस्त्यावरुन प्रवास करणे टाळावे, असा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिला आहे.

महापालिकेने हाती घेतलेली पावसाळापूर्व नालेसफाईची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शहर आणि उपनगरांतील मोठ्या नाल्यांची सफाई ९९ टक्के, तर छोट्या नाल्यांची ८७ टक्के सफाई पूर्ण झाली आहे. मुंबईतील मिठी नदीसह, मोठ्या नाल्यांमधील एकूण ४ लाख ८५ हजार ४३० मेट्रीक टन गाळ काढणे अपेक्षित असून त्यातील ७० टक्के म्हणजे ३ लाख ३९ हजार ८०१ मेट्रीक टन एवढा गाळ काढण्यात आला आहे. त्यातील ३ लाख ३६ हजार ८०१ मेट्रीक टन गाळाची विल्हेवाट डम्पिंग ग्राऊंडवर लावण्यात आली आहे. आतापर्यंत पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार्‍या ७० टक्के नालेसफाईच्या ९९ टक्के सफाईचे काम पूर्ण झाले आहे.          विद्याधर खंडकर, प्रभारी मुख्य अभियंता, पर्जन्य जलवाहिन्या विभाग

महापालिका प्रशासनाने १०० टक्के नालेसफाईचा दावा केला असला तरी नालेसफाईची कामे अद्याप समाधानकारक झालेली नाहीत. तशा प्रकारची सफाई झालेली दिसत नाही. त्याबाबत प्रशासनाने कंत्राटदारांना जाब विचारावा, असे आदेश दिले आहेत.
– विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -