घरताज्या घडामोडीबेस्ट चालकांची रॅश ड्रायव्हिंग, मुंबईकरांना 'खांदे'वात...

बेस्ट चालकांची रॅश ड्रायव्हिंग, मुंबईकरांना ‘खांदे’वात…

Subscribe

कोरोना काळात बेस्ट बसेसचा प्रवास मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून बेस्ट चालकांच्या रॅश ड्रायव्हिंगच्या तक्रारी वाढल्याने आता मुंबईकरांना खांदेवातीची सुरुवात झाली आहे.

कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकरांची उपनगरीय लोकल सेवा बंद आहे. राज्य सरकारने जेव्हा पुनश्च हरि ओमची घोषणा केली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल नेमकी कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे खासगी कंपन्या, कार्यालयातील कर्मचारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना बेस्टच्या बसेसवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र,कोरोना काळात बेस्ट बसेसचा प्रवास मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून बेस्ट चालकांच्या रॅश ड्रायव्हिंगच्या तक्रारी वाढल्याने आता मुंबईकरांना खांदेवातीची सुरुवात झाली आहे. इतकेच नव्हेतर बेस्ट चालकांच्या या रॅश ड्रायव्हिंगमुळे एका दुचाकी चालकाचा मृत्यूसुद्धा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बेस्ट चालकांची रॅश ड्रायव्हिंग सुसाट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरात बेस्टच्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. आता अनलॉकची सुरुवात होताच, बेस्ट बसेसची प्रवाशांची संख्या झपट्याने वाढली आहे. त्यामुळे बेस्टच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णतः तीनतेरा वाजले आहेत. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे बेस्ट चालकांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत. अनेक प्रवाशांना हातदुखी, पायदुखी, मान लचकणे, कमरेत चमक भरत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांनी यासंबंधी बेस्टकडे तक्रारीसुद्धा केल्या आहेत. मात्र, बेस्ट चालकांनी रॅश ड्रायव्हिंग करणे सोडले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. बेस्ट चालकांना ४० किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा कमी वेगाने बस चालविणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण गर्दीच्या रस्त्यावरही काही चालक खेप संपविण्याच्या घाईमध्ये रात्री बस दामटत असतात. रस्त्यावरील खड्डे, सिग्नलचेही भान त्यांना नसते. याबाबत प्रवाशांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जाते. याबाबत बेस्टच्या तक्रार निवारण कक्षाकडे प्रवासी तसेच नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात. मात्र, या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. आता रविवारी लोअर परेलच्या बावला मस्जिद जवळ बेस्ट चालकांच्या निष्काळजीपणामुळे एका दुचाकी चालकाचा मुत्यू झाल्याचीसुद्धा घटना समोर आली आहे. पोलिसांनी बेस्ट चालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

- Advertisement -

प्रवाशांच्या जीवाला धोका

बेस्ट चालकांना बसेसची वेगाची मर्यादा घालून दिलेली असतानाही त्याचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर आले आहे. बेस्टच्या वाहतूक विभागाने चालकांसाठी नियमावली केलेली आहे. त्यानुसार बस चालविताना मोबाईलवर बोलू नये, मर्यादेपेक्षा जास्त वेग ठेवू नये, धुम्रपान करू नये, बस थांब्याजवळच थांबवावी, प्रवासी चढ-उतार करेपर्यंत बस हलवू नये अशा सूचना सातत्याने दिल्या जातात. मात्र,अनेक चालक या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

 लॉकडाऊनमुळे मी बेस्ट बसचा प्रवास करतो आहे. बेस्ट चालकांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे माझ्या उजव्या हाताला चमक भरली. त्यामुळे मी तीन दिवस कार्यालयात जाऊ शकलो नाही. बेस्ट प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तसेच बस कधीही वेळेवर मिळत नाही. काही वेळा बस आगारामध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याशिवाय बस सोडत नाहीत आणि मग बसमध्ये गर्दी होते. – नामदेव बनकर, प्रवासी, गोरेगाव.

मुंबई महानगरपालिका 25 वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असूनसुद्धा मुंबईकरांना चांगले रस्ते देऊ शकले नाहीत हे त्यांचे मोठे अपयश आहे. ते अपयश बेस्टच्या चालकांवर ढकलण्याचा प्रयत्न केला जात असतो. मुंबईतील प्रवासी त्याला बळी पडत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेने चांगले रस्ते प्रवाशांना उपल्बध करून देण्यात यावेत. – सुनिल गणाचार्य, वरिष्ठ सदस्य, बेस्ट समिती

रॅश ड्रायव्हिंग, चालक मोबाईलवर बोलणे, आसनांची दुरावस्था, थांब्यावर बस न थांबविणे, प्रवाशांशी योग्य वागणूक नसणे यांसह अन्य तक्रारी कक्षाकडे येतात. या तक्रारी कक्षामार्फत संबंधित आगारांकडे पाठविल्या जातात. त्यांच्यावर योग्य ती कारवाई बेस्टकडून केली जाते. तसेच प्रवाशांच्या तक्रारीसाठी 24/7 हेल्पलाईनसुद्धा बेस्टकडून उपल्बध करून देण्यात आली आहे. त्यावरसुद्धा प्रवासी तक्रार करू शकतात. – मनोज वराडे, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट उपक्रम

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -