घरमुंबईराष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या आठ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या आठ प्रकल्पांची निवड

Subscribe

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे भरवण्यात येणार्‍या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत यावर्षी मुंबईतील आठ विज्ञान प्रकल्पांची निवड झाली आहे. १० ते १७ वयोगटातील मुलांमध्ये विज्ञान संशोधन वृत्तीचा विकास करण्यासाठी ही परिषद भरवण्यात येते. यावर्षी 27 ते 31 डिसेंबरदरम्यान ही परिषद भुवनेश्वर येथे होणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील बाल विज्ञान परिषद ही नेहमी भरवल्या जाणार्‍या विज्ञान प्रदर्शनासारखी नसून, यामध्ये विद्यार्थी संशोधन करून वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करतात. त्यावर एक छोटेखानी प्रबंध लिहितात आणि तो या परिषदेत सादर करण्यात येतो. ऑक्टोबरमध्ये झालेल्या जिल्हा स्तरास्तरीय स्पर्धेत मुंबईतून सहभागी झालेल्या 253 प्रकल्पांपैकी 14 प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय परिषदेसाठी राज्यातून निवडलेल्या 73 प्रकल्पांमधून 30 प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. यापैकी आठ प्रकल्प मुंबईतील आहेत. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे तर मुंबईतील जिल्हास्तरीय स्पर्धा नवनिर्माण विज्ञान प्रबोधन संस्थेमार्फत भरवण्यात आली होती.

- Advertisement -

निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये बोरिवलीतील सेंट जॉन्स हायस्कुलचा ‘क्लोरोफिलिसिटी हीच शाश्वत ऊर्जा’, जोगेश्वरीतील अरविंद गंडभीर शाळेचा ‘टेट्रा पॅक आणि प्लास्टिक बॉटल्सपासून बनविलेल्या वस्तूंचा तुलनात्मक अभ्यास’ माटुंगामधील डॉन बॉस्को शाळेचा ‘घन कचरा व्यवस्थापन’ वडाळ्यातील स्वाध्याय भवन शाळेचा ‘फायलोरेमेडीशन’ या चार प्रकल्पांची लहान गटातून निवड झाली आहे. तर मोठ्या गटात दहिसरमधील व्हीपीएम विद्या मंदिर, मुलुंडमधील होली एंजेल्स, सायनमधील साधना विद्यालय व मुलुंडमधील जे.जे. अकॅडेमी या शाळांचा प्रकल्प आहेत. या परिषदेसाठी शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण निरीक्षक कार्यालयामार्फत जुलैमध्ये विज्ञान शिक्षकांसाठी 20 प्रशिक्षण कार्यशाळा भरवून सुमारे 500 शिक्षकांना प्रशिक्षित केले होते. अशी माहिती मुंबई जिल्हा बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष बी. बी. जाधव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -