घरमुंबईप्लास्टीक बंदीविरोधात पालिकेची धडक कारवाई

प्लास्टीक बंदीविरोधात पालिकेची धडक कारवाई

Subscribe

ठाणे महापालिकेने प्लास्टीक विरोधात धडक कारवाई करण्यास सुरूवात केली असून आतापर्यंत नोव्हेंबर अखेरपर्यंत महापालिकेने ५.७ टन प्लास्टीक जप्त केले असून दंडापोटी १ लाख ९० हजार रूपये दंड वसूल केला आहे. प्लास्टीक बंदी विरेाधात पालिकेची कारवाई थंडावल्याने प्लास्टीक बंदीचा आदेश पायदळी तुडवला जात असल्याचे वृत्त आपलं महानगरने काही दिवसांपूर्वीच प्रकाशित केलं होतं. त्यानंतर महापालिका प्रशासन पून्हा कामाला लागल्याचे दिसून आले.

राज्य शासनाने प्लास्टीक व थर्माकोल अविघटनशील वस्तूचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक आदीवर बंदी घातली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने सुरूवातीला प्लास्टीक बंदी विरोधात जोरदार कारवाई केली. मात्र काही दिवसानंतर ही कारवाई थंडावल्याने बाजारपेठेत दुकानदार व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून राजरोसपणे प्लास्टीक पिशव्यांचा वापर केला जात आहे. तसेच भाजी विक्रेत फळविक्रेत अथवा मासळी विक्रेत्यांबरोबरच फुल आणि हार विक्रेते यांच्याकडून पिशव्या वापरल्या जात आहेत. प्लास्टीक बंदीचा ठाणे शहरात फज्जा उडाला असल्याचे वृत्त आपलं महानगरने २३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलं होतं. त्या वृत्तानंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून प्लास्टीक बंदी विरोधात कारवाईस सुरूवात केली आहे. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीनेसन २०१८ १९ या आर्थिक् वर्षात नागरिकांकडून २०.५ टन प्लास्टीक संकलन करण्यात आले आहे तसेच ७२ रहिवाशी संस्था आणि सामाजिक संस्थेच्यावतीने ७२ टन प्लास्टीक जप्त करण्यात आले आहे. तसेच २०१९- २० या आर्थिक वर्षात नाेव्हेंबर पर्यंत आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून ५.७ टन प्लास्टीक जप्त करण्यात आले आहे. ३०० रहिवाशी संस्था आणि सामाजिक संस्थेच्यावतीने २८९ टन प्लास्टीक जप्त करण्यात आले असून दंडापोटी ४० लाख एवढी रक्कम वसूल करण्यात आल आहे. प्लास्टीकप्रमाणे थर्माकोलपासून बनविण्यात येणारी ताटे वाटया कप ग्लास यांच्या वापराचे प्रमाणही अधिक आहे. या सर्व वस्तू विघटन न होणा-या असून पर्यावरणास हानीकारक आहेत या वस्तूची विक्री आणि वापर दोन्ही बेकायदा असून त्याचा वापर करताना पहिल्यांदा आढळल्यास ५ हजार रूपये दुस-यांदा आढळल्यास १० हजार दंड आणि तिस-यांदा आढळल्यास २५ हजार रूपये व ३ महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. शासनाने लागू केलेल्या प्लास्टीक व थर्माकोल बंदीची काटेकोर अंमलबजावणी करून ठाणे शहर स्वच्छ राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -