घरमुंबईएपीएमसीतून भाजपचा बाजार उठला

एपीएमसीतून भाजपचा बाजार उठला

Subscribe

महाविकास आघाडीचे १८ पैकी १६ संचालक विजयी!

आशिया खंडात सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचा अक्षरश: ‘बाजार’ उठला. भाजपला एकही संचालक या निवडणुकीत निवडून आणता आला नाही. महाविकास आघाडीचे मात्र १६ संचालक दणदणीत मतांनी विजयी झाले तर दोन ठिकाणी अपक्ष निवडून आले. भाजपकडून एपीएमसीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मात्र साधे खातेही न खोलले गेल्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट कमिटीवर पूर्ण राज्यभरातून आणि मार्केटमधून निवडल्या जाणार्‍या १८ संचालकांची निवडणूक शनिवारी पार पडली. या निवडणुकीत राज्यभरातील सहा महसुली विभागांतून आणि एपीएमसीच्या चार मार्केटमधून सुमारे ९२ टक्के मतदान झाले होते. तर सोमवार, २ मार्च रोजी मतमोजणी झाली. त्यामध्ये भाजीपाला मार्केटमधून शंकर पिंगळे, कांदा-बटाटा मार्केटमधून अशोक वाळुंज, धान्य मार्केटमधून नीलेश वीरा आणि मसाला मार्केटमधून विजय भुता हे मोठे मताधिक्य घेऊन निवडून आले.

- Advertisement -

फळ मार्केटमधून संजय पानसरे आणि माथाडी कामगारातून शशिकांत शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीमध्ये शंकर पिंगळे यांना सर्वात जास्त ९९६ मते मिळाली.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्यभरातून १२ संचालक हे शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असतात. प्रत्येक महसुली विभागातून दोन संचालकांची निवड केली जाते. शनिवारी झालेल्या निवडणुकीत राज्यभरातील १२ पैकी दहा संचालक हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत. त्यामध्ये नागपूर विभाग-सुधीर कोठारी, हुकुमचंद आमधरे, संभाजीनगर विभाग-अशोक डक, वैजनाथ शिंदे, अमरावती विभाग-प्रवीण देशमुख, माधवराव जाधव, पुणे विभाग-बाळासाहेब सोळस्कर, धनंजय वाडकर, कोकण विभाग-राजेंद्र पाटील आणि नाशिक विभाग-जयदत्त होळकर यांचा समावेश आहे. प्रभू पाटील (कोकण) आणि अद्वय हिरे (नाशिक) हे अपक्ष संचालकही निवडून आले आहेत.

रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कालावधी गेल्या पाच वर्षांपूर्वीच संपला होता. मात्र तत्कालीन भाजप सरकारने संचालक मंडळाच्या निवडणुका लावण्याऐवजी बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक केली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत एपीएमसीची अनेक कामे रखडली. मात्र आता संचालक मंडळाची निवडणूक झाल्यामुळे ही सर्व रखडलेली कामे आणि प्रकल्प मार्गी लागणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -