घरमुंबईचिमुकलीची हत्या करून दाम्पत्याची आत्महत्या

चिमुकलीची हत्या करून दाम्पत्याची आत्महत्या

Subscribe

नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

ठाण्याच्या डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या पाटील दाम्पत्याने आपल्या ६ वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यू झालेले शिवराम पाटील यांचे मालमत्तेच्या वादातून नातेवाईकांशी बिनसले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद होता. भावांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या जाचाला कंटाळून शिवराम पाटील, त्यांची पत्नी दीपाली यांनी आत्महत्या केली. त्याआधी त्यांनी त्यांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप या दाम्पत्यावर आहे. हा प्रकार सोमवारी पहाटे उघडकीस आला.

आत्महत्येपूर्वी शिवराम पाटील यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यात १३ जणांच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. डायघर पोलीस ठाण्याने ताब्यात घेतलेल्या या सुसाईड नोटमध्ये नोंद असलेल्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी डायघर पोलीस अधिक तपास करीत आहेत. डायघर पोलीस ठाणेअंतर्गत वाकलण गावात मृतक शिवराम पाटील(३८), पत्नी दीपाली (३३) आणि सहा वर्षांची मुलगी अनुष्का (६) हे राहत होते. शिवराम पाटील यांचा त्यांच्या भावांशी आणि वहिनींशी मालमत्तेवरून वाद होता. कुटुंबातील लोकांच्या होणार्‍या त्रासाला कंटाळून शिवराम पाटील यांनी सुसाईड नोट लिहून ज्यांच्यामुळे त्रास झाला आणि नैराश्य आले त्यांच्या नावाचा नोटमध्ये उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.

- Advertisement -

आत्महत्या करण्यापूर्वी शिवराम पाटील यांनी सुसाईड नोट नातेवाईकांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल केली. त्या सुसाईड नोटमध्ये भांडणाला कारणीभूत असलेले वसंत रामा पाटील, रमाकांत पाटील यांच्यासह काशिनाथ रामा पाटील, चंद्रकांत रामा पाटील, नागनाथ रामा पाटील, सुवर्णा रमाकांत पाटील, शोभा चंद्रकांत पाटील, रोशन चंद्रकांत पाटील, प्रवीण चंद्रकांत पाटील, मनोहर वसंत पाटील, सुभद्रा वसंत पाटील, वैभव चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.
दार उघडले आणि सर्व संपले….

आत्महत्या करण्यापूर्वी शिवराम पाटील याने सुसाईड नोट लिहिली आणि व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल केली. ती पाहून शिवरामच्या पत्नीचा भाऊ श्रीनाथ किणे (रा. डोंबिवली) याने रात्री १२ वाजल्यानंतर त्याचा मित्र किसन याला शिवरामच्या घरी पाठविले. किसन हा शिवरामच्या घरी पोहचला. त्याने दरवाजा वाजवल्यावरही दार उघडले नाही. त्याने दार तोडले असता शिवराम, दीपाली आणि चिमुरडी अनुष्काही गळफास असलेल्या अवस्थेत आढळले.

- Advertisement -

त्याने त्वरित डायघर पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत मृतक दीपालीचा भाऊ श्रीनाथ हाही घरी पोहचला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करीत विच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात नेले. पोलिसांनी घराची झडती घेतल्यानंतर त्यांना सुसाईड नोट मिळाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मालमत्ता अनाथ आश्रमाला देण्याची शेवटची इच्छा
मृत्यू झालेले शिवराम पाटील यांनी सुसाईड नोटमध्ये ज्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे, त्यांची नावे लिहिली आहेत. याशिवाय आई गुणाबाई पाटील यांचा या आत्महत्येशी काहीच संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे. शिवाय माझी मालमत्ता, दागिने हे माझ्या पत्नीचा भाऊ श्रीनाथ किणे यांच्याकडे द्यावी. त्यानंतर ती मालमत्ता अनाथ आश्रमाला द्यावी, असे स्पष्ट नमूद केले आहे. तर बहीण जनाबाई अशोक साळुंखे हिचे ५० हजार रुपये आणि गंठण तिला परत द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. या नोटमध्ये आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -