घरमुंबई५८ हजार कोटी फिक्समध्ये तरीही दरवर्षी मुंबई पावसात बुडते ! 

५८ हजार कोटी फिक्समध्ये तरीही दरवर्षी मुंबई पावसात बुडते ! 

Subscribe

नितीन गडकरी यांचा मुंबई महपालिकेवर निशाणा

मुंबई महापालिकेचे 58 हजार कोटी बँकेत फिक्स डिपॉझिट मात्र तरीही दरवर्षी पावसाच्या पाण्यात मुंबई बुडते, असा टोला हाणत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला. मुंबई महानगरपालिकेने ठरवले तर मुंबईचे समुद्र किनारे मॉरिशससारखे सुंदर होतील, अशी अशाही त्यांनी केली. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून बोरिवली पश्चिम गोराई येथील कांदळवन उद्यानाची (मॅग्रोव्ह पार्क)ची निर्मिती करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात नितीन गडकरी उपस्थित होते. त्यानंतर अटलस्मृती उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले की, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज भारत देश ’सुपर इकॉनॉमी’ च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र मुंबईचा समुद्र मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबईच्या समुद्राला प्रदूषणाला नक्कीच मुक्तता मिळू शकते आणि मुंबईचा समुद्रही नजिकच्या काळात मॉरिशिसमधील समुद्रांसारखा प्रदूषणमुक्त व स्वच्छ न निर्मल होईल असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
सॉलिड वेस्ट आणि लिक्वीड वेस्ट मॅनेजमेंट यातून शहरांचा विकास करता येऊ शकतो. एवढच नाही तर सॉलिड वेस्ट आणि लिक्वीड वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून योजनात्मक काम केल्यास याचे परिवर्तन वेल्थ मॅनेजमेंटमध्ये होऊ शकतो. मुंबईसह महाराष्ट्राला जल प्रदूषण व वायू प्रदूषण याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास व पर्यावरण पूरक प्रकल्प व योजना हाती घेतल्यास मुंबई आगामी काळात जल व वायू प्रदूषणापासून मुक्त होऊ शकते, असेही गडकरी म्हणाले.

- Advertisement -

बोरिवली पश्चिम येथील गोराई कांदळवन उद्यानामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, या अभिनव प्रकल्पाच्या माध्यमातून कांदळवनांचे संवर्धन तर होईलच पण हा प्रकल्प फक्त महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी पर्यावरणाच्यादृष्टीने एकआदर्श ठरेल, असे गडकरी यांनी सांगितले. याप्रसंगी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, आमदार भाई गिरकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार विलास पोतनीस, आमदार मनिषा चौधरी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -