घरमुंबईगणपती सुट्टीला इंग्रजी शाळांची नकारघंटा

गणपती सुट्टीला इंग्रजी शाळांची नकारघंटा

Subscribe

मुंबईतील अनेक शाळांनी यंदा गणेशोत्सवासाठी सुट्टी जाहीर केलेली नाही. यात बहुतांश इंटरनॅशनल शाळांचा समावेश असून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश जास्त आहे. तर काही शाळांनी फक्त एकच दिवस सुट्टी जाहीर करत विद्यार्थी आणि पालकांची बोळवण केली आहे. मुख्य म्हणजे, मुंबईसह राज्यातील अनुदानित शाळांनी पाच दिवसांची सुट्टी जाहीर केलेली आहे.

मुंबई : आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज झाले असले तरी मुंबईतील विद्यार्थी आणि पालकांच्या पदरी निराशा पडली आहे. राज्य शिक्षण विभागाने गणेशोत्सवानिमित्त सुट्टी जाहीर केली असली तरी मुंबईतील अनेक इंग्रजी शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिलेली नाही. काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली असली तरी शिक्षकांना मात्र शाळेत येणे बंधनकारक केल्यामुळे त्यांच्यासमोर नवे विघ्न उभे राहिले आहे.

मुंबईसह उभ्या महाराष्ट्रात गणशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर घराघरात लाडक्या बाप्पांचे स्वागत केले जाते. मात्र लाडक्या बाप्पांचे स्वागत करण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मुंबईतील अनेक शाळांनी यंदा गणेशोत्सवासाठी सुट्टी जाहीर केलेली नाही. यात बहुतांश इंटरनॅशनल शाळांचा समावेश असून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश जास्त आहे. तर काही शाळांनी फक्त एकच दिवस सुट्टी जाहीर करत विद्यार्थी आणि पालकांची बोळवण केली आहे. मुख्य म्हणजे, मुंबईसह राज्यातील अनुदानित शाळांनी पाच दिवसांची सुट्टी जाहीर केलेली आहे. यासंदर्भातील सरकार निर्णय ही गेल्यावर्षी जाहीर केलेला आहे. मात्र त्यानंतरही शाळांनी सुट्टी जाहीर न केल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

- Advertisement -

दरम्यान, शाळांच्या या प्रशासनाच्या या निर्णयाला टीडीएफ या शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल बोलताना टीडीएफचे उपाध्यक्ष राजेश पंड्या म्हणाले की, राज्य सरकारने शाळांना सुट्टी जाहीर केली असली तरी राज्यभरातील शिक्षकांना बीएलओची कामे देण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टीचा फायदा नाही. तर शिक्षणमंत्र्यांनी यासंदर्भात काही कोकणातील शिक्षकांना दिलासा दिला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून यासंदर्भात विचार होणे गरजेचे असल्याचे मत पंड्या यांनी व्यक्त केले आहे.

तर शाळांवर कारवाई करण्याची मागणी करणार

दरम्यान, महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे पाच दिवस सुट्टी जाहीर करावी, अशी आग्रही मागणी मनविसेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येते. त्यासाठी सरकारकडून परिपत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही जर शाळा सुट्टी देत नसेल तर मनसे नक्कीच या शाळांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करणार आहे. – सुधाकर तांबोळी, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -