घरमनोरंजनमुंबईकरांचा पडद्यावरचा विघ्नहर्ता

मुंबईकरांचा पडद्यावरचा विघ्नहर्ता

Subscribe

गणेशोत्सव ही मुंबईची ओळख आहे. त्यामुळे मुंबईतल्या बॉलिवूडनेही मुंबापुरीची ही परंपरा जपली. अमिताभ अभिनित मुकूल आनंदचा अग्निपथ १९९० मध्ये आला. बालपणीचं समुद्रकिनार्‍याचं मांडवा गाव आईला मिळवून देण्यासाठी विजय दिनानाथ चौहान अर्थात अमिताभ मुंबईतून गँगवॉर चालवतो. त्यावेळी मुंबईचं चित्रण करण्यासाठी मुकूल आनंदच्या मदतीला गणपती बाप्पाच आले होते.

एन चंद्रांचा ‘अंकुश’ १९८६ मध्ये रिलिज झाला. अंकुशच्या पडद्याची सुरुवातंच गणपती बाप्पांच्या आगमनाने होते. दादरच्या टायकलवाडीतला गुंड सुबल्या, त्याचे चाकूसुर्‍यांनी हाणामारी करणारे साथीदार आणि रवी (नाना पाटेकर) आणि त्याचे सुहास पळशीकर (लाल्या) या तरुणांच्या आपापल्या एरियातले गणपती विसर्जनासाठी पुढे निघालेले असतात. दादरच्या एका नाक्यावर ते समोरसमोर येतात. आता कुणाचा गणपती पुढे जाणार यावरून त्यांच्यात तणाव निर्माण होतो. सायकलच्या चेन, बॅट, हॉकीस्टीक, सोडावॉटरच्या बाटल्या बाहेर काढल्या जातात…अंकुशचा हा प्रसंग सिनेमाची पुढची दिशा ठरवतो, मुंबईतल्या रस्त्यावरच्या गँगवॉरच्या वास्तववादी प्रसंगांनी अंकुशला मोठं यश मिळवून दिलं. त्यामुळे आर्थिक अडचणीतूनही मार्ग काढत अंकुश पूर्ण करणार्‍या एन. चंद्रांना खर्‍या अर्थानं बॉलिवूडमध्ये पाय रोवता आले. नर्गिस दत्त यांचं कर्करोगानं निधन झाल्यानंतर या आजारामुळे एकूणच जगण्यात आलेली अपरिहार्य हतबल वेदना पडद्यावर मांडण्यासाठी सुनिल दत्त यांनी १९८२ मध्ये ‘दर्द का रिश्ता’ बनवला. यात सुनिल दत्त आणि रिना रॉयच्या मुलीला झालेला कर्करोग या दोघांनाही हतबल करतो. त्यावेळी गणपती बाप्पाला प्रार्थना केली जाते.

मेरे मन मंदिर में तूम भगवान रहे
मेरे दुख से तुम कैसे अंजान रहे..

- Advertisement -

अशी तक्रार सुनील दत्त यांनी चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजातून पडद्यावर केली होती. त्याआधी के बापय्यांचा ‘टक्कर’ १९८० मध्ये रिलिज झाला. यात बाप्पांच्या मूर्तीत खलनायक मंडळींनी काही सोनं लपवून त्याची स्मगलिंग सुरू केलेली असते. संजीव कुमार, जितेंद्र, विनोद मेहरा नायक मंडळींना हे समजल्यावर ते व्हिलनटोळीचा हा मनसुबा अखेरची हाणामारी, गाड्यांची मोडतोड करून धुळीला मिळवतात. असाच काहीसा प्रकार १९८१ मध्ये आलेल्या ‘हम से बढकर कौन’च्या कथानकात होता. ऐंशीच्या दशकांत आलेल्या या चित्रपटांतील गणपती बाप्पांची गाणी त्यावेळी दूरदर्शनच्या छायागीत, चित्रहारमधून हक्कानं वाजवली जात होती. गणेशोत्सव ही मुंबईची ओळख आहे. त्यामुळे मुंबईतल्या बॉलिवूडनेही मुंबापुरीची ही परंपरा जपली. अमिताभ अभिनित मुकूल आनंदचा अग्निपथ १९९० मध्ये आला. बालपणीचं समुद्रकिनार्‍याचं मांडवा गाव आईला मिळवून देण्यासाठी विजय दिनानाथ चौहान अर्थात अमिताभ मुंबईतून गँगवॉर चालवतो. त्यावेळी मुंबईचं चित्रण करण्यासाठी मुकूल आनंदच्या मदतीला गणपती बाप्पाच आले होते. तर अलिकडेच आलेल्या ऋतीक रोशनच्या ‘अग्निपथ’मध्येही मुंबईची गणेशोत्सवाची देवा श्री गणेशा या गाण्यातून ही ओळख कायम ठेवण्यात आली. चंद्रा बारोटच्या (१९७८) च्या पहिल्या डॉन चित्रपटांत मुंबईची ओळख करून देण्यासाठी किशोरचं गाणं होतं. इ है बंबई नगरीया तू देख बबुआ…या डॉनमध्ये गणपतीचं गाणं नव्हतं. पण शहारुखने त्याचा रिमेक बनवल्यावर बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया…हे गाणं खास मुंबईची ओळख सांगण्यासाठी बनवण्यात आलं.

मुंबईतील गुन्हेगारी जगताचं दर्शन घडवणार्‍या सिनेमांमध्ये रामगोपाल वर्माच्या सत्याचं नाव सर्वात पुढे येतं. सत्यामध्ये भाऊ ठाकूरदास जावळेचा गेम करण्यासाठी सत्या कालूमामाला घेऊन गिरगावच्या चौपाटीवर जातो. या ठिकाणी भाऊ गणेश विसर्जनाची आरती करत असतो. भिकू म्हात्रेच्या हत्येचा बदला म्हणून त्याचा गेम सत्याकडून होतो. यातलं दादरचा शिवाजी पार्कमधील उद्यान गणेश किंवा मुंबईतील ठिकठिकाणही इतर लहानमोठे बाप्पांच्या मंदिरातले प्रसंग दाखवून रामूने मुंबईचे वास्तववादी चित्र कमालीचे परिणामकारक केले होते. याचाच धागा पुढे महेश मांजरेकरांनी ‘वास्तव’मध्येही पकडला. रघूनाथ नामदेव शिवलकरचा एन्काऊंटर होणार असल्याचं त्याला कळतं. यावेळी पडद्यावर गणेशोत्सवाची शिवाजी साटम यांच्यावर चित्रित झालेली आरती आठवतेच. महेश मांजरेकरांच्याच ‘विरुद्ध’मध्ये अमिताभने बाप्पांची प्रार्थना केली आहे. रितेश देशमुखचा बँजो येऊन गेला, त्यातही मुंबईतल्या तरुणांच्या सांस्कृतिक जीवनाचं प्रतिनिधीत्व म्हणून गणेशोत्सवाचा आधार घेतला गेला. मुंबई आणि गणेशोत्सव परंपरेचं नातं अतूट आहे. मुंबईतली गुन्हेगारी, कामगारांचा संघर्ष, आर्थिक सुबत्ता असलेल्यांचं झगमगतं जग, नोकरदारांच्या रोजच्या जगण्यातला संघर्ष यामुळे या कथानकांच्या सिनेमांतून मुंबईची लाईफस्टाईल समोर येण्यासाठी गणपती बाप्पांचाच आधार बॉलिवूडला अनेकदा घ्यावा लागला आहे. नेहमीच धावणार्‍या मुंबईकरांच्या जगण्यावर दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट, पूरस्थिती अशी विघ्ने येतच असतात. मात्र, मुंबईकरांच जगणं थांबत नाही आणि मुंबईही थांबत नाही…मुंबईकरांची ही विघ्ने दूर करायला बाप्पा पुरेसा असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -