घरमुंबईBMC : …तरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाची मते काँग्रेसला

BMC : …तरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाची मते काँग्रेसला

Subscribe

मुंबई महापालिकेच्या शिक्षण व स्थायी समितीसह वैधानिक समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस यांचे उमेदवार आमने–सामने ठाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या नगरसेवकाची मते शिवसेनेच्या पारड्यात पडणार आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आघाडी सरकार असले तरी महापालिकेत ही आघाडी न मानता काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेसोबत असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे मत आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेना करणार आहे. शिवाय संभाव्य दगाफटका लक्षात घेता सपाचे मतही शिवसेनेच्याच बाजुने झुकले जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, शिवसेना, काँग्रेस बरोबरच भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यास या दोन्ही पक्षाची मते काँग्रेसलाच जावू शकतात, असाही अंदाज आहे.

 

- Advertisement -

शिक्षण व स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत भाजप आणि काँग्रेस पक्षानेही आपले उमेदवार उभे केल्याने राजकीय समिकरणांची उकल सुरु झाली. काँग्रेस व भाजपने आतापर्यंत चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहे. परंतु या निवडणुकीत काँग्रेस व भाजप आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे न घेण्याच्या पावित्र्यात असल्याने तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाची मते फुटली जाणार नाही. परंतु भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास शिवसेना आणि काँग्रेसमध्ये लढत होईल. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या पारड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मत पडणार नाही. भाजपकडून दगाफटका होण्याची भीती लक्षात घेता शिवसेनेने हे मत आपल्याकडे वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. मात्र, तिन्ही पक्षाचे उमेदवार उभे राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व सपाची मते काँग्रेसलाच मिळू शकतात, अन्यथा नाही.

सध्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा अप्रत्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हाती आहे. मात्र, सध्या मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काहीच चालत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मानले जातात. परंतु महापालिकेतील पक्षाच्या गटनेत्यांकडून त्यांचे आदेश परस्पर बदलले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याने या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मतदान करावे, असे वाटत असले तरी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे ते मत शिवसेनेकडे वळते होवू शकते. निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून हे मत आपल्या उमेदवाराच्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचा राहणार आहे. तसेच समाजवादी पक्षाचेही मत फिरवून ते घेवू शकतात.

- Advertisement -

 

भाजपने काँग्रेसला मतदान केल्यास शिक्षण समितीत काँग्रेस व भाजपचे संख्या १३ एवढे होईल. तर राष्ट्रवादी काँग्रेस व सपाच्या मदतीने शिवसेनेची एकूण मतेही १३ एवढीच बरोबरीत होतील. त्यामुळे चिठ्ठीच्या माध्यमातून उमेदवार निवडला जावू शकतो. त्यामुळे चिठ्ठीत शिक्षण समिती अध्यक्ष शिवसेना उमेदवार निवडून आल्यास स्थायी समितीत त्यांची सदस्य संख्या १२ एवढी होतील. परंतु काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यास शिवसेनेची संख्या ११ एवढीच राहतील आणि काँग्रेसची संख्या एकने वाढून ४ एवढी होईल.

 

स्थायी समितीत काँग्रेसचे ३ सदस्य असून भाजपचे मतदानाचा अधिकार असलेले ९ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे संख्या बळ १२ एवढे होऊ शकते, तर शिवसेनेचे ११ व एक शिक्षण समिती अध्यक्ष अशाप्रकारे त्यांचे संख्याबळ १२ एवढे होईल. त्यामुळे अशा परीस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस व सपाची मते ही शिवसेनेसाठी निर्णायक ठरणारी आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस व सपाची दोन मते काँग्रेसकडे जावू न देता आपल्या झोळीत पाडून घेणेच शिवसेनेसाठी योग्य ठरणार असून त्यादृष्टीकोनातून शिवसेनेचे प्रयत्न राहतील. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस व सपाची मते काँग्रेसच्या बाजुने झुकल्यास भाजप आपला गेम साधण्यात यशस्वी होणार आहे. परंतु या दोघांनी शिवसेनेला मतदान केल्यास महापालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व सपाची घट्ट मैत्रीत दरी करण्यात भाजपला नक्कीच यश मिळेल. मात्र, राजकारणाची ही समिकरणे प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षांचे नेते आणि अध्यक्ष पुढील परिणामांचा विचार करून काय निर्णय घेतात यावरच अवलंबून आहेत.

हेही वाचा –

सरकार अस्थिर करण्याची भाजपला नामी संधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -