घरमुंबईमैदानातील स्टेज, खोल्यांच्या बांधकामाला विरोध

मैदानातील स्टेज, खोल्यांच्या बांधकामाला विरोध

Subscribe

आयुक्तांनी काम थांबवले

भाईंदर पूर्वेकडील सुभाषचंद्र बोस मैदानात 80 लाख रुपये खर्चून भले मोठे व्यासपीठ (स्टेज) आणि आलिशान खोल्या बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अधिकार्‍यांचा प्रस्तावाला महासभेत मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे मैदान नष्ट होण्याची भीती असल्याने खेळाडू आणि नागरीकांनी त्याला कडाडून विरोध केला. त्याची दखल घेत महापालिका आयुक्तांनी बांधकाम थांबवले आहे.

मीठागराच्या जागेत कचरा व माती भराव करुन तयार केलेले सुभाषचंद्र बोस मैदान हे मुर्धा, भाईंदर आदी भागातील ग्रामस्थांनाच नव्हे तर शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी खेळण्याचे एकमेव मैदान आहे. याठिकाणी सकाळी व सायंकाळी मोठया संख्येने खेळाडु व नागरिक खेळण्यासाठी येत असतात. त्यातही शनिवार – रविवार सुट्टीच्या दिवशी तर या मैदानावर खेळाडुंची जत्राच भरते.

- Advertisement -

याआधी सदर मैदान शनिवार – रविवार व सुट्टीच्या दिवशी खाजगी संस्था, व्यक्ती , संघटनांना महापालिका राजकिय संगनमताने भाडयाने देत होती. जेणेकरुन सुट्टीचा दिवस असूनही खेळण्यासाठी येणार्‍या खेळाडू, मुले व नागिरकांना मैदानात खेळु न देता हुसकावून लावले जायचे. अखेर याप्रकरणी खेळाडुंच्या व्यथा आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे मांडल्या नंतर त्यांनी गंभीरपणे दखल घेत शहरातील सर्वच खेळाची मैदाने शनिवार – रविवार भाड्याने देण्यास बंद केले होते.

आता महासभेत नगरसेवकांनी केलेल्या ठरावानंतर महापालिका प्रशासनाने कोणताही सारासार विचार न करताच तब्बल 80 लाख खर्चाचे स्टेज व आलिशान खोल्या यासाठी ठेका दिला. 200 फुट लांब व 30 फूट रुंद असे हे काम चक्क मैदानातच बांधकाम सुरु केले आहे. त्यासाठी मैदानात दगड आदी आणून टाकण्यात आले आहेत. आधीच मैदान अपुरे असताना त्यात भर मैदानात महापालिकेने काम सुरू केल्याने खेळाडु व नागरिक संतापले आहेत. त्यांनी थेट महापालिका आयुक्तांची भेट घेऊन याला विरोध केला. आयुक्तांनी फोटो पाहुन प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

खतगावकरांनी कार्यकारी अभियंता दिपक खांबित , उद्यान अधिक्षक नागेश विरकर यांच्यासह मैदानातील कामाची पाहणी केली. यावेळी मैदानातील नेहमीचे खेळाडु असलेले पोलीस निरीक्षक विजय पाटील, लाला माछी, हितेश माछी, अविनाश पाटील, विजय पाटील, पराग पाठारे, गणेश जाधव, वॅली रॉड्रिक्स, शैलेष म्हामुणकर आदींनी आयुक्तांकडे आपल्या सुचना व तक्रारी मांडल्या. आयुक्तांनी भर मैदानातले काम पाहुन ते रद्द करण्यास तसेच महापालिकेच्या पडिक टाकीजवळ ते प्रस्तावित करण्यासाठी आराखडा तयार करा असे खांबित यांना सांगीतले. आयुक्तांनी स्टेजचे काम बंद करण्यास सांगीतल्याने खेळाडुंनी त्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -