घरमुंबईशिक्षण खात्याला पुढल्या वर्षात ढकलले

शिक्षण खात्याला पुढल्या वर्षात ढकलले

Subscribe

शैक्षणिकदृष्ट्या वादाचे ठरले वर्ष
मुंबई विद्यापीठाच्या नेहमीच्या परीक्षा विभागाच्या गोंधळात यंदा काही काळ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याने हे वर्ष मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा ठरलं खरे. पण नॅक मूल्यांकनाचा रखडलेला प्रश्न असो, किंवा आरक्षणामुळे अकरावी प्रवेशाचा उडालेला गोंधळ आणि दहावीच्या निकालात कमालीची आलेली घट यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्षात अवघड पेपरच सोडविण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली होती. परंतु येत्या वर्षात यापैकी अनेक प्रश्न सुटण्याची शक्यता असल्याने येते वर्ष हे शैक्षणिकदृष्ट्या काय घेऊन येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

नॅक मूल्यांकनाचा प्रश्न चिघळला
विद्यापीठाला नॅक मूल्यांकन नसल्याने आयडॉल मान्यतेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. परंतु यूजीसीकडून आयडॉलला मान्यता मिळवत विद्यार्थ्यांना दिलासा .

- Advertisement -

मराठा आरक्षणामुळे वैद्यकीय प्रवेशात गोंधळ
वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाजातील 250 विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश धोक्यात आले होते. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन सुरू केले. आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने प्रवेशप्रक्रियेला सात दिवस स्थगिती देत विद्यार्थ्यांना दिलासा दिला. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रवेशप्रक्रियेला मुदतीत पूर्ण होणे अवघड झाले होते. अखेर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला.

आयआयटीमध्ये मोकाट गुरांचा सुळसुळाट
आयआयटी मुंबईच्या परिसरातील मोकाट जनावरांचा विषय यावर्षी ऐरणीवर आला. आयआयटीच्या परिसरात फिरणारी जनावरे थेट वर्गामध्ये फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाले. तसेच गुरांच्या झालेल्या झुंजीमध्ये एक विद्यार्थीही जखमी झाला. पालिकेने गुरांवर कारवाई केली असता आयआयटीतील कर्मचाऱयांनी त्याला विरोध केला. आयआयटी कडून समिती स्थापन करण्यात आली असली तरी त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.

- Advertisement -

नाशिकमध्ये उभारणार पदव्युत्तर मेडिकल कॉलेज
राज्यातील वैद्यकीय कॉलेजांना मान्यता देणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असले तरी तिथे अद्यापपर्यंत एकही सरकारी मेडिकल कॉलेज नाही. त्यामुळे नाशिकमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. नाशिकमध्ये सुरू होणार्या पहिल्या पदव्युत्तर मेडिकल कॉलेजमध्ये 100 जागा असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

अकरावीचे प्रवेश रखडले
मराठा आरक्षण व संवर्णातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळांना दिलेल्या आरक्षणामुळे यंदा अकरावी प्रवेशाचा गोंधळ निर्माण झाला होता. मराठा आरक्षण 16 टक्के आणि सवर्ण आरक्षण 10 टक्के लागू झाल्याने आरक्षणाची टक्केवारी 103 टक्क्यांवर पोहचली होती. त्यामुळे शिक्षण विभागाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी व्यवस्थापन कोट्यातील 10 टक्के जागा कमी कराव्या लागल्या.

दहावीच्या निकालात घट
दहावीचा राज्याच्या निकाल गतवर्षीच्या तुलनेत 12.31 टक्के तर मुंबईचा निकाल 13.37 टक्क्यांनी कमी लागला. परीक्षेचे पॅटर्न बदलल्याने निकालावर परिणाम झाला. शाळा व शिक्षणसंस्थांनी निकालाचे चिंतन करण्याची गरज व्यक्त करण्यात येत होती.

परीक्षेचा गोंधळ कायम
मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी विभागाच्या इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी या विषयाच्या सेमिस्टर आठच्या पेपरमध्ये तब्बल 30 गुणांचे प्रश्न जुन्या अभ्यासक्रमामधील देण्यात आले. त्याचप्रमाणे बॅचलर ऑफ इंजिनियरींग (आयटी)च्या स्टोरेज नेटवर्क मॅनेजमेंट रिट्रायव्हल या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न देण्याबरोबरच बॅचलर ऑफ इंजिनियरींगच्या परीक्षेमध्ये गतवर्षीचीच प्रश्नपत्रिका चुकांसह देण्यात आली.

वैद्यकीय कॉलेजसह जागा वाढीस मान्यता
वैद्यकीय पदव्युत्तर, पदवी आणि आता पदवी प्रवेशाचा प्रश्न चिघळल्यानंतर अखेर राज्य सरकारला राज्यात एमबीबीएसच्या जागा वाढवण्याबाबत केंद्राकडून मान्यता मिळवण्यात यश आले. त्यामुळे आता राज्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत भासणारी डॉक्टरांची कमतरता दूर होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्यात सात नवीन सरकारी वैद्यकीय कॉलेजांसह काही खासगी वैद्यकीय कॉलेजांना मान्यता दिली. त्यामुळे राज्यात ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमांच्या ३ हजार ६७० जागांमध्ये वाढ झाली. यात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी २ हजार २० तर सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीय समाजासाठी १ हजार ६५० जागा वाढवून देण्यास मान्यता मिळाली आहे.

सत्तावीस ऐवजी आता वीस सात
जोडाक्षरे ही मुलांच्या मनामध्ये गणिताची भिती व नावड निर्माण करण्यास हातभार लावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाटणारी ही भिती दूर करण्यासाठी व त्यांना गणितामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी ‘बालभारती’ने दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात जोडाक्षरे असणार्या संख्या टाळले आहे. त्यामुळे आता दुसरीच्या वर्गातून सत्तावीस, अठ्ठावीस, पंचेचाळीस व सत्त्याण्णव या शब्दांऐवजी वीस सात, वीस आठ, चाळीस पाच व नव्वद सात असे शब्द शिकवण्यात येतील.

क्यूएस रँकींगमध्ये मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये आयआयटी मुंबईने देशात अव्वल क्रमांक पटकावला तर मुंबई विद्यापीठाने राज्यामध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. क्यूएस रँकींगमध्ये जगामध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने 200 विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या क्रमवारीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. आयआयटी मुंबई गतवर्षी 179 क्रमांकावर होती. यावर्षी त्यात वाढ होऊन ते 162 क्रमांकावर पोहचले आहे. त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने 170 वा तर आयआयटी दिल्लीने 172 वा क्रमांक पटकावला. क्यूएस वर्ल्ड रॅकिंगमध्ये आयआयटी मुंबई ही देशातून अव्वल ठरली असताना मुंबई विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. तर राज्यामध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. क्यूएसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने पाच वर्षात भरीव कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी अतुलनीय आहे.

सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर बिघाडाचे ग्रहण
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर यांच्या प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू होऊनही तिला यंदा सर्व्हर बिघाडाचे ‘ग्रहण’ लागले. 17 जूनपासून सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेला पहिल्या दोन दिवसांतच सर्व्हर बिघाडाचे ग्रहण लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया विलंबाने झाल्या.तर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, अर्किटेक्चर, विधी, बीएड, एमबीए या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाईन घेण्यात आल्या. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदा पहिलेच वर्ष असल्याने आणि कर्मचारी अपुरे असल्याने अडचणींचा सामना सीईटी सेलला करावा लागला.

कॉलेज निवडणुका झाल्याच नाहीत
राज्यातील कॉलेजांमध्ये तब्बल 25 वर्षाहून अधिक काळानंतर पुन्हा होणार्‍या विद्यार्थी परिषद निवडणुकीचे वेळापत्रक यावर्षी जाहीर झाले. परंतु लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमुळे कॉलेजमधील निवडणूका झाल्याचं नाहीत. 19 ते 30 ऑगस्टपर्यंत निवडणूक होणार होती. मुंबई विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठी विभाग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता तर कॉलेज विद्यार्थी परिषदेसाठी वर्ग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक होणार होत्या.

बारावीची परीक्षा 600 गुणांची
शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता ११ वीसाठी व शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता १२ वीसाठी अंतिम मूल्यमापन हे 6५० ऐवजी ६०० गुणांचे राहील. पर्यावरण शास्त्र विषयाच्या 50 गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात येईल. तसेच पर्यावरण शास्त्र विषयामध्ये ‘जल सुरक्षा’ हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात येणार आहे.

अनुदानाचा सिलसिला कायम
मराठी व प्रादेशिक भाषेतील ज्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान आजतागायत १९ वर्षे सुरू केले नाही, त्यांना सुरू करावे.. तसेच ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना २०% अनुदान सुरू केले, त्यांना नियमानुसार १००% अनुदान द्यावे. या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला. सरकारच्या कारवाईचा सर्वच स्तरातून निषेध. हल्ल्याच्या घटनेनंतर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी 20 टक्के अनुदान मान्य केले. मात्र 100 टक्के अनुदानासाठी शिक्षक ठाम, भर पावसात केले आंदोलन

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -