घरताज्या घडामोडीमाहूलमध्ये प्रदूषणाला पुन्हा सुरुवात, स्थानिकांचे राज्य सरकारला साकडे

माहूलमध्ये प्रदूषणाला पुन्हा सुरुवात, स्थानिकांचे राज्य सरकारला साकडे

Subscribe

माहूल परिसरात पुन्हा एकदा वाढणाऱ्या प्रदुषणामुळे नागरिकांचा लॉकडाऊनच्या काळातला नाहक त्रासदेखील पुन्हा एकदा वाढला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून माहूल परिसरात पुन्हा एकदा प्रदुषणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा या प्रदुषणाविरोधात आवाज उठवायला सुरूवात केली. रात्रीच्या वेळेतच आरोग्यासाठी हानीकारक अशी रसायने ही खुल्या पद्धतीने फेकली जात असल्याने त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा प्रदुषणात वाढ झाली आहे. या प्रदुषणाविरोधात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याबाबतची माहिती ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे.

सातत्याने तीन दिवस पाठपुरावा केल्यानंतर आता अखेर एमपीसीबीचे अधिकारी हे माहूल परिसरात चौकशीसाठी पोहोचले. पण या भेटीमधून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळेच स्थानकांनी या प्रकरणात सरकारने लक्ष घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. स्थानिकांच्या आरोग्याच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, याचा त्रास हा जेष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना होत असल्याने याबाबतची तत्काळ दखल शासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितानाच पर्यावरण सचिव अनिल डिग्गीकर यांनाही पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माहूल कोळीवाड्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २३ कोरोना पॉझिटीव्ह केसेस आतापर्यंत सापडल्या आहेत. तर अनेक लोकांना माहूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळेच या परिसरातील प्रदुषण करणाऱ्यांना कंपन्यांना काम करण्यापासून मज्जाव करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. म्हणूनच या संपुर्ण प्रकरणाची चौकशी एमपीसीबीने तात्काळ करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्थानिकांकडून करण्यात आली आहे. एमपीसीबीने नुकत्याच केलेल्या दौऱ्यानंतर आता सातत्याने हवेची गुणवत्ता नोंदवण्यासाठी रात्रीच्या वेळीही टीम कार्यरत असणार आहे. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेऊन कारवाई करणे शक्य होईल असे एमपीसीबीचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -