घरमुंबईभाऊबीज निधीतून विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती

भाऊबीज निधीतून विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती

Subscribe

एसएनडीटी विद्यापीठाकडून 10 मुलींना मदत

देशातील मुलींसाठीचे पहिले विद्यापीठ असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) स्थापनेत भाऊबीजेच्या ओवाळणीतून मोठा वाटा आहे. याच पार्श्वभूमीवर एसएनडीटी विद्यापीठाने त्यांच्या हुशार व गरजू विद्यार्थिंनीना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी 2017 मध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेंतर्गत भाऊबीज उपक्रम सुरू केला. भाऊबीज उपक्रमातून यावर्षीपासून 10 विद्यार्थिनींना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. ही शिष्यवृत्ती पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्याक्रमाच्या विद्यार्थिनींना देण्यात येणार आहे.

एसएनडीटी विद्यापीठामार्फत 2017 मध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेंतर्गत सुरू केलेल्या भाऊबीज उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार 2017 पासून आतापर्यंत तब्बल 101 लोकांनी पुढाकार घेत सढळ हस्ते मदत केली. यातून विद्यापीठाकडे तब्बल 25 लाख 31 हजारांचा निधी जमा झाला. या निधीच्या मिळणार्‍या व्याजातून एसएनडीटीच्या प्रशासनाकडून विद्यापीठातील तसेच विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमधील 10 विद्यार्थिंनींना यंदापासून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यावर्षीची भाऊबीज शिष्यवृत्तीसाठी बी.एड, विधी, बीए, ई लर्निंग व होम सायन्स अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिंनींची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थिंनींपैकी तीन विद्यार्थिंनी पदवी, तीन विद्यार्थिंनी पदव्युत्तर अभ्यासक्रम, तीन विद्यार्थिंनी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजमधील तर एक विद्यार्थिंनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची आहे. निवड झालेल्या विद्यार्थिंनींमधील 40 टक्के मुली या मुस्लिम समाजाच्या आहेत. भाऊबीज शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडे तब्बल 44 अर्ज आले होते. त्यातून १० विद्यार्थिनींची गुणवत्ता, गरज यांचा विचार करून निवड करण्यात आली आहे, अशी माहिती एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी दिली.

- Advertisement -

एसएनडीटीच्या स्थापनेत ‘भाऊबीज’ मोलाची
एसएनडीटीची स्थापना भारतरत्न महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी 1921 मध्ये केली. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी कर्वे यांनी भाऊबीज उपक्रमांतर्गत नागरिकांकडून निधी जमा केला होता. महिलांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या भाऊबीजेचा त्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेतही तितकाच मोलाचा वाटा आहे. त्यामुळे विद्यार्थिंनींना सक्षम करण्यासाठी आम्ही भाऊबीज उपक्रम राबवल्याचे कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी सांगितले.

विद्यार्थिंनीना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी ‘भाऊबीज निधी’ शिष्यवृत्ती सुरू केली. दानशूर व्यक्तींना त्यांच्या ऐपतीनुसार मदत करायची असल्याने ‘भाऊबीज निधी’ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दानशूर व्यक्तींचा प्रतिसाद कायम राहिल्यास विद्यार्थिंनीच्या संख्येत वाढ करण्यात येईल
– डॉ. शशिकला वंजारी, कुलगुरू, एसएनडीटी विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -