घरमुंबईआदिवासीं समाजात हक्कांची जाणीव करून देणे आवश्यक

आदिवासीं समाजात हक्कांची जाणीव करून देणे आवश्यक

Subscribe

डॉ. प्रकाश आमटेंच्या हस्ते ‘माडिया शिकूया’चे प्रकाशन

आदिवासी समाजात हक्काची जाणीव करून द्यायला हवी, हक्कांसाठी आदिवासींनी झगडले पाहिजे यासाठी शिक्षण महत्त्वाचे होते. या जाणिवेतून आदिवासी बहुल भागात शाळांची निर्मिती झाली. मात्र शिक्षकांना आदिवासींची बोलीभाषा येत असल्याने माध्यमात अडथळे होते. यासाठी आदिवासींची बोलीभाषा शिकणे महत्त्वाचे आहे. माडिया भाषा शिकवणारे हे पुस्तक निश्चितच आदिवासींपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी पुण्यात केले.

महाराष्ट्राच्या दुर्गम भागात राहणार्‍या माडिया या आदिवासी जमातीची भाषा सहजरित्या शिकता यावी यासाठी लिहिलेल्या ‘माडिया शिकू या’ पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, सहसंचालक नंदिनी आवडे उपस्थित होत्या. गडचिरोली आणि छत्तीसगढमधील जंगलात वास्तव्यास असणारे आदिवासी माडिया भाषा बोलतात. मात्र या ठिकाणच्या नव्या पिढीचा शहराशी संबंध आल्याने त्यांची मातृभाषा विस्मृतीत जात आहे. ही आदिम भाषा जपली जावी यासाठी जर्मन भाषेच्या अभ्यासिका डॉ. मंजिरी परांजपे, मैथिली जोशी, ख्रिस्टीन फरायस, ऋजुता टिळेकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. भाषा अभ्यासक, संशोधक, माडिया शिकण्याची इच्छा असलेले आदिवासी तरुण यांना या पुस्तकाचा उपयोग होणार आहे.

- Advertisement -

आदिम भाषा आणि अत्याधुनिक पद्धती यांचे अनोखे मिश्रण असलेल्या या पुस्तकात देवनागरीचा उपयोग करण्यात आला आहे. हे पुस्तक स्वयंअध्ययनासाठी असून दृश्यभाषेतून सहज शिकता येईल, असे अभ्यासक्रम या पुस्तकात देण्यात आले आहेत, असे लेखिका डॉ. मंजिरी परांजपे यांनी सांगितले. या पुस्तकासाठी मनीषा मज्जी या आदिवासी मुलीने माडिया भाषेतील शब्दांचे अर्थ उलगडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. मनिषाबरोबरच गडचिरोली भागात राहणार्‍या आदिवासी मुलींची मदत झाल्याचे परांजपे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -