घरमुंबईमध्य रेल्वे स्थानकात फिरणार सेगवे

मध्य रेल्वे स्थानकात फिरणार सेगवे

Subscribe

मध्य रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात पाच नवीन सेगवे वाहने दाखल झाली आहेत. यामुळे आरपीएफ दलातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांना फेरफटका, मदतकार्य करणे सोपे होईल. बॅटरीवर चालणार्‍या या सेगवेद्वारे स्थानकाची पाहणी करता येईल. तसेच आपत्कालीन स्थितीत मदतकार्य वेळेत पोहोचविण्यासाठी ही वाहने महत्त्वाची ठरणार असल्याचे आरपीएफच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवरील आरपीएफकडे बॅटरीवर चालणारी ही पाच वाहने देण्यात आली आहेत. यामधील गर्दीची स्थानके म्हणून ओळखल्या जाणार्‍या सीएसएमटी आणि एलटीटी या मेल, एक्सप्रेसच्या स्थानकावर सेगवे वाहने ठेवण्यात आली आहेत. या सेगवे वाहनांची कामगिरी पाहून दादर, पनवेल, लोणावळा या स्थानकांतही ही वाहने चालवण्यात येणार आहेत. तसेच यापूर्वी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरीवली या स्थानकांवर प्रत्येकी एक सेगवे वाहन दाखल झाले आहे. सेगवे हे विद्युत उपकरण असून एकदा त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर किमान सात ते आठ तास त्याचा वापर करता येतो. ताशी २० किमी वेगाने धावू शकणार्‍या या सेगवेवर एक व्यक्ती आरामात फिरू शकते. तसेच या उपकरणाच्या दोन्ही चाकांवर दोन बॉक्स लावण्यात आले असून त्यामध्ये वॉकी टॉकी, डायरी, पाण्याच्या बाटल्या यांसारख्या वस्तू ठेवता येतील.

- Advertisement -

सेगवेद्वारे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलातील अधिकारी आणि कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य पोहोचवू शकतात. सुरुवातीला या वाहनांची कामगिरी पाहिली जाईल. त्यानंतर या सेगवे वाहनांच्या संख्येत वाढ केली जाईल. उपनगरीय लोकल स्थानकात गर्दीमुळे या वाहनांना चालविण्यासाठी जागा होणार नाही, त्यामुळे मेल एक्सप्रेस स्थानकात ही वाहन चालविण्यात येत आहे.
– अशरफ के.के, आरपीएफ, मुंबई विभागीय सुरक्षा आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -