घरमुंबईमोनोरेलच्या प्रवाशांकडून एमएमआरडीचा हिरमोड

मोनोरेलच्या प्रवाशांकडून एमएमआरडीचा हिरमोड

Subscribe

एका महिन्यात अवघ्या साडेपाच लाख प्रवाशांनी केला प्रवास

अनेक अडचणींचा सामना करत सुरू झालेल्या मोनोरेलच्या दुसर्‍या टप्प्याला एक महिना उलटल्यानंतरही प्रवासी संख्या वाढत नाही. एका महिन्याच्या कालावधीत मोनोरेलच्या चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या टप्प्यात अवघ्या ५ लाख ५५ हजार ५४ प्रवाशांनी प्रवास केला आहे. तसेच केवळ ९६ लाख २९ हजार ९२४ रुपयांचा महसूल मिळाला आहे. मोनोरेलला नव्या टप्प्यात अपेक्षित असलेला प्रवासी संख्येचा टप्पा गाठण्यात मात्र अपयश आले आहे. मोनोरेलच्या दुसर्‍या टप्प्यात मोठ्या प्रमाणात प्रवासी आकर्षित होतील, असा अंदाज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने व्यक्त केला होता.

मोनोरेलच्या स्थानकांना इतर वाहतुकीच्या पर्यायांची जोड द्या, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले होते. मोनोरेलची स्थानके ही रेल्वेच्या स्थानकांशी जोडा असेही मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते. तसेच मोनोरेलच्या स्थानकाला जोडूनच रिंग रूटचा पर्याय देण्यासाठीचा विचार एमएमआरडीए आयुक्त आर.ए. राजीव यांनी मांडला होता. मोनोरेलला इतर वाहतुकीचे पर्याय जोपर्यंत जोडून उपलब्ध होत नाहीत तोवर रोजच्या कामानिमित्त मोनोरेलचा वापर करणारे प्रवासी एमएमआरडीएला मिळणे कठीण आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मोनोरेलच्या दुसर्‍या टप्प्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोनोरेलची स्थानके ही सबवे तसेच स्कायवॉकने जोडण्यासाठी ना हरकत देत असल्याचे जाहीर केले होते. यासाठी आता याकरता मुख्यमंत्री हे रेल्वेमंत्र्यांकडे किती लवकरच पाठपुरावा करणार, हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

एमएमआऱडीएचा अपेक्षाभंग

एका महिन्यात मोनोरेलचा प्रवास करणार्‍यांमध्ये जॉय रायडर्सची संख्या जास्त होती. हे पहिल्या पंधरवड्यातील आकडेवारीतून स्पष्ट झाले होते. मुंबई शहराच्या दिशेने जाणारा चाकरमानी वर्ग आकर्षित करण्यात मोनोरेलला तितकेसे यश अजून आलेले नाही. लोकलच्या प्रवासाच्या तिकिटाच्या तुलनेत मोनोरेलचे तिकीट जास्त आहे, पण कमी गर्दीचा पर्याय म्हणून सध्या मोनोरेलकडे पाहता येऊ शकते. मात्र, स्वच्छता, स्थानकांवर आसन व्यवस्था, शौचालये अशा अनेक सुविधांच्या बाबत मोनोरेलमध्ये अधिक सुधारणा करावी लागणार आहे. एमएमआरडीएने वडाळा डेपो ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पा सुरू झाल्यावर एक लाख प्रवासी दररोज मोनोरेलने प्रवास करतील असा अंदाज वर्तवला होता, पण प्रत्यक्षात सरासरी २५ हजार प्रवाशांनी मोनोरेलने दररोज प्रवास केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -