घरमुंबईज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

Subscribe

१६ नोव्हेंबर 1927-१७ डिसेंबर २०१९

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ‘नटसम्राट’अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी दिपा लागू आहेत. पुण्यातील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात बुधवारी ठेवण्यात येणार आहे. गुरूवारी त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

श्रीराम लागू यांनी अभिनेता म्हणून नाटक आणि चित्रपटसृष्टीमधील कारकीर्द गाजवली होती. अभिनयासोबतच त्यांनी सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले होते. डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला होता. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्षे काम केले. नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. 1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता.

- Advertisement -

त्यांनी १९६९ मध्ये इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून पूर्णवेळ नाट्य अभिनेता म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली होती. कुसुमाग्रज यांच्या ‘नटसम्राट’ ह्या नाटकात डॉ. लागू यांनी साखरलेली गणपतराव बेलवलकर यांची भूमिका अजरामर झाली. डॉ. लागू यांनी नाट्यक्षेत्रासोबत चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. सिंहासन, सामना, पिंजरा हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. ’लमाण’ हे डॉ. लागूंचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ’लमाण’ हे पुस्तक म्हणजे कोणत्याही नटासाठी अभिनयाचे बायबल आहे, असे म्हटले होते. डॉ. लागू यांना फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

डॉ. श्रीराम लागू हे नास्तिक होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते. नंतर ’देवाला रिटायर करा’ नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते. ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले आहेत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. ते विज्ञानवादी आणि समाजवादी आहेत. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटते. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरूण पिढीला डॉ. लागू नेहमी सांगत असत.

- Advertisement -

नटसम्राट हरपला!

अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाचे वृत्त कळताच मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी हळहळली. आपल्या अभिनयाने मराठी तसेच हिंदी रसिकांच्या हृदयात घर केलेला एक महान अभिनेता, खर्‍या अर्थाने नटसम्राट हरपला अशी प्रत्येकाची भावना होती. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यापैकी काहीजणांनी व्यक्त केलेल्या या भावना…

वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. श्रीराम लागू यांचा कलाक्षेत्रावर प्रभाव होता. जुन्या जाणत्यांपासून होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. लागू यांच्या निधनाने महाराष्ट्र प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने आपण अत्यंत श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणार्‍या व्यक्तीला मुकलो. डॉ. लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली. – जयंत पाटील, अर्थमंत्री

ज्या काळात रंगभूमीवर शैलीबद्ध अभिनयाचा पगडा होता त्या काळात डॉक्टरांनी आपल्या वास्तववादी अभिनयाने रंगभूमीला एक वेगळी दिशा दिली. डॉक्टर हे विचारवंत नट होते. त्यांनी विचार आणि नाटक कधी एकमेकांपासून वेगळे मानले नाही. शिस्तबद्ध आणि पुरोगामी विचार असलेले एक नाट्यपर्व आणि खर्‍या अर्थाने नटसम्राट व्यक्तिमत्वच आज आपल्यात नाही याचे दुःख आहे.
– चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक

सर्वार्थाने मोठा अभिनेता, रंगकर्मी आणि आमचे आदर्श श्रीराम लागू गेले याचं अतीव दुःख झाले. नाटकांवर प्रेम करणारा माणूस हरपला याचं दुःख होत आहे. – सुबोध भावे, अभिनेता.

डॉ. श्रीराम लागू हे हॅम्लेट पाहण्यासाठी आले होते. त्यांनी तीन तास ते नाटक पाहिलं त्यानंतर मला आशीर्वाद दिले त्यामुळे मी भरुन पावलो,
– सुमीत राघवन, अभिनेता.

डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय पारदर्शक होते. त्यांनी आपल्या अभिनयातून नेहमी एक विचार मांडला. ते खर्‍या अर्थानं अभ्यासू आणि विचारी नट होते. सॉक्रेटिसनं वर्णन केल्याप्रमाणे ते अ‍ॅथलिट आणि तत्वज्ञ नट होते.
– सतीश आळेकर, नाटककार

प्रमुख नाटके
* नटसम्राट, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र, इथे ओशाळला मृत्यू
प्रमुख चित्रपट
सामना, पिंजरा, सिंहासन,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -