घरमुंबईसाथसदृश परीक्षार्थींसाठी स्वतंत्र कक्ष

साथसदृश परीक्षार्थींसाठी स्वतंत्र कक्ष

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांकडून सतर्कता

चीनमधून पसरत असलेल्या करोना व्हायरसला आळा घालण्यासाठी भारताकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाकडून देशातील सर्व शाळांना विशेष उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सुरू असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान साथसदृश्य परीक्षार्थींसाठी शाळांनी पुढाकार घेतला आहे. साथसदृश्य विद्यार्थ्यांसाठी शाळांकडून स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे दहावी व बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळत आहे.

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून सर्व राज्यातील मुख्य सचिवांना शाळांमध्ये विशेष उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांनाही मंत्रालयाकडून पत्र पाठवण्यात आले आहे. करोना व्हायरसला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असताना राज्यातील शाळांनीही पुढाकार घेतला आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेवर करोना व्हायरसचा कोणताही प्रभाव पडू नये व अन्य विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी परीक्षेवेळी साथसदृश्य विद्यार्थी आढळून आल्यावर त्याची शिक्षकांकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांची परीक्षा चुकू नये यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती शाळांकडून देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही सूचना दिल्या आहेत की, सर्दी, ताप यासारखे आजार असल्यास शाळेत येऊ नये, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

दहावी व बारावीची परीक्षा सध्या सुरू असल्याने एखाद्या विद्यार्थ्याला सर्दी, ताप, थंडी यासारखे साथीचे आजार असल्याचे आढळल्यास त्याची चौकशी करण्यात येत आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी स्वतंत्र वर्गामध्ये व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती टीचर्स डेमोक्रेटीक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले. परीक्षेदरम्यान साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रामध्ये न बसवता त्याला स्वतंत्र वर्गात बसवण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत. जेणेकरून त्याला परीक्षा देणे सोईस्कर होईल व अन्य विद्यार्थ्यांनाही त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी सदस्य उदय नरे यांनी दिली.

विद्यार्थ्यांना प्रार्थनेवेळी मार्गदर्शन
करोना हा आजार संसर्गजन्य असल्याने शाळास्तरावरून विद्यार्थ्यांना दररोज प्रार्थनेवेळी करोना विषाणू संसर्गाची लक्षणे व उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना 20 सेकंदापर्यंत हात स्वच्छ धुणे, लक्षणे असलेल्या लोकांशी संपर्क टाळा, मास्क वापरणे, लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक व परिसरातील नागरिकांमध्ये जागरुकता करण्याबाबतच्या सूचना मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी शाळांना दिल्या आहेत.

- Advertisement -

सर्दी, ताप, कांजण्या अशा संसर्गजन्य आजाराने त्रस्त विद्यार्थ्यांसाठी आम्ही परीक्षेवेळी स्वतंत्र व्यवस्था करतो. दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची असल्याने व यावेळी करोना व्हायरसची भीती पसरल्याने आम्ही साथसदृश्य विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. जेणेकरून अन्य विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही.
– राजेंद्र गोसावी, मुख्याध्यापक, चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, गिरगाव

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -