घरमनोरंजनशायराना जादू - जावेद अख्तर साहेब

शायराना जादू – जावेद अख्तर साहेब

Subscribe


१७ जानेवारी १९४५ ला ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या जावेद अख्तर साहेबांना लिखाणाचा वारसा त्यांच्या आई-वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे वडील जा निसार अख्तर प्रसिद्ध उर्दू कवी होते तर आई सफिया अख्तर प्रसिद्ध उर्दू लेखिका होती. जावेद साहेबांचं खरं नाव त्यांच्या आई-वडिलांनी ‘जादू’ असं ठेवलं होतं. या नावामागची कहाणी अशी की, जा निसार साहेबांनी एक शेर लिहिला होता, “लम्हा लम्हा किसी जादू का फसाना होगा”… यातल्या जादू या शब्दावर त्यांनी आपल्या मुलाचं नाव जादू असं ठेवलं. पण त्यावेळी त्यांना माहित नव्हतं की शब्दांच्या या जादूगाराची जादू भारतीय चित्रपटसृष्टीवर गारुड करेल !
‘किसी लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे…’ अशा गाण्यातून सोप्या आणि सुटसुटीत शब्दांत भावना व्यक्त करण्याचं कसब ज्या जावेद अख्तर साहेबांचं आहे त्यांचाच आज वाढदिवस. गीत असो वा गझल त्याची साधी सोपी मांडणी करण्यात जावेद साहेबांचा हात कुणीच पकडू शकत नाही. कला आणि साहित्याच्या क्षेत्रात ते जेवढे पारंगत आहेत, तेवढीच त्यांची सामाजिक आणि राजकीय समज प्रगल्भ आहे.
शिक्षण पूर्ण होता-होता जावेदसाहेबांनी कागज -कलम हाती घेऊन आई-वडिलांच्या पावलावर पावलं टाकायला सुरुवात केली होती. १९६४ साली त्यांची पावलं मुंबईकडे वळली. काही काळ मुंबईत बेघर काढल्यानंतर त्यांना कमाल अमरोहींच्या स्टुडिओत आसरा मिळाला. सोबतच कैफी आझमींना असिस्ट करण्याची संधीही मिळाली. आणि मग तो दिवस उजाडला जेंव्हा जावेद साहेबांना त्यांचा पहिला चित्रपट मिळाला. जिथे त्यांची ओळख सलीम खान साहेबांसोबत झाली. आश्चर्य म्हणजे सलीम खान त्या चित्रपटात नायकाची भूमिका साकारणार होते आणि या चित्रपटाचं नवं होतं ‘सरहद्दी लुटेरा’. या चित्रपटासाठी जावेद साहेबांवर असिस्टंट डायरेक्टर म्हणून जबाबदारी असली तरी प्रत्यक्षात मात्र ते एक क्लॅपर बॉय होते. हा चित्रपट दणदणीत आपटला. पण यातून एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे सलीम आणि जावेद या दोन स्ट्रग्लर्सची या दरम्यान मैत्री झाली. इंडस्ट्रीत सलीम साहेबांचा हिरो म्हणून टिकाव लागत नव्हता आणि जावेद साहेबांची नैया पण हेलकावे खात होती. म्हणून दोघांनीही चित्रपट लिखाणाचं काम हाती घेतलं. सलीम कथेची मूळ संकल्पना मांडू लागले आणि जावेद त्यात संवादाची पेरणी करू लागले. दोघांच्याही नशिबाने म्हणा किंवा प्रयत्नांनी म्हणा एक अशी स्क्रिप्ट त्यांच्याकडून लिहिली गेली, ज्यावर बनवलेला ‘हाथी मेरे साथी’ हा सुपरस्टार राजेश खन्ना अभिनीत चित्रपट सुपरहिट झाला. या कथेने फिल्मइंडस्ट्रीमध्ये धमाका केला. या एका चित्रपटाने सलीम जावेद जोडगोळीची डूबती नैया किनाऱ्याला लागली. यानंतर प्रत्येक निर्माता स्क्रीनप्लेसाठी सलीम जावेदचीच मागणी करू लागला. या जोडगोळीने १९७१ ते १९८२ दरम्यान तब्बल २४ चित्रपटांचं लेखन एकत्र केलं. ज्यात हाथी मेरे साथी, सीता और गीता, शोले, यादों की बारात, दिवार, जंजीर असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट आहेत. जंजीर ने तर अमिताभ बच्चनला तारलं. त्याला अँग्री यंग मॅनची उपाधी मिळाली. असं म्हटलं जातं की, अमिताभचे चांगले दिवस आल्यावर त्याला मिळणाऱ्या चित्रपटांचा स्क्रीनप्ले सलीम जावेदचा असावा अशी तो निर्मात्यांकडे मागणी करू लागला.
पुढे ‘जोड्या बनतात तशा बिघडतात’ या उक्तीला अनुसरून मिस्टर इंडियानंतर या जोडगोळीने एकमेकांचा निरोप घेतला. पण जावेद साहेबांचं गीत लेखन चालूच होतं. त्यांच्या तेजाब, १९४२ या लव्हस्टोरी, लगान, बॉर्डर अशा चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गाणी हिट झाली. जावेद साहेबांना त्यांच्या गीतांसाठी आठ वेळा फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. १९९९ साली जावेद अख्तर साहेबांना त्यांच्या साहित्य कारकिर्दीतील बहुमूल्य योगदानासाठी पद्मश्री आणि २००७ साली पदमभूषण पुरस्कराने सन्मानित करण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -