६५ जणांच्या कुटुंबात घडल राजकीय नेतृत्व

राजकीय वारशाशिवाय मंत्रीपदाची माळ

आम्ही एकूण पाच भाऊ. सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावी आमच्यापैकी तिघे भाऊ शेती करतात. तर दोघे जण राजकारणात आहेत. एकूण ६५ जणांचे आमच कुटुंब आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना आज मंत्रीपदाची जबाबदारी बंधुंना मिळाल्याने खूपच आनंद झाल्याचे सांगताना तानाजी सावंत यांच्या मोठ्या भावाचे डोळे भरून आले होते. मिळालेल्या जबाबदारीसाठी खूप आनंद झाला आहे. गर्व वाटण्यासारखी ही आमच्या कुटुंबासाठीची गोष्ट आहे असेही ते म्हणाले.

तानाजी सावंत यांना एकूण ११ पुतणे आहेत. त्यापैकी काही जण आज शपथविधी सोहळ्यासाठी हजर होते. राजभवनात चाललेल्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आमच कुटुंब मोठ आहे, एकत्र कुटुंबात राहतानाच हे यश आता सगळ्यांसाठी मोठे आहे. आता सेलिब्रेशन करण्याची वेळ खरी कार्यकर्त्यांसोबतची आहे. कौटुंबिक सेलिब्रेशन तर जंगी होणारच अशी प्रतिक्रिया त्यांच्या भावाने दिली. राजकारणात तानाजी सावंत यांचा एक भाऊ सक्रीय आहे. तर पुतण्यांचाही कल राजकारणात अधिक वाढत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

तानाजी सावंत यांनी शिवसेनेत अवघ्या तीन वर्षात कॅबिनेट मंत्री पदाची माळ गळ्यात पाडून घेतलेली आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अतिशय नजीकच्या आणि लाडक्या व्यक्तींमध्ये तानाजी सावंत यांनी स्वतःच स्थान निर्माण केले आहे. उस्मानाबाद आणि सोलापूर याठिकाणच संपर्कपद त्यांना शिवसेनेत देण्यात आले होते. तर यवतमाळ वाशिममधून त्यांनी विधान परिषदेचे तिकीट मिळवले आहे.

जेएसपीएम ही शिक्षण संस्था आणि भैरवनाथ शुगर हा खासगी साखर कारखाना त्यांनी नियोजनबद्ध चालवून दाखवला. २०१६ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सगळ्या श्रीमंत उमेदवार म्हणून तानाजी सावंत यांचे नाव चर्चे आले होते. त्यांच्याकडे ११५ कोटी ४५ लाख रूपये इतकी संपती असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमुद केले होते.