घरमुंबईकोणाच्या 'धनुष्यबाणा'ने रावणाचं होणार दहन

कोणाच्या ‘धनुष्यबाणा’ने रावणाचं होणार दहन

Subscribe

शिंदे गटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या एकाच वेळी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यांना अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दसऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. यात दोन्ही गटांतील नेत्यांनी आपापल्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी ताकद लावली आहे. खरी शिवसेना कोणाची, शिंदे गटाने गद्दारी केली की नाही, हे पटवून देण्यासाठी दसरा मेळाव्यातील गर्दी महत्त्वाची मानली जात आहे. यात गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करून आपलीच शिवसेना खरी हे दाखवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांतील पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे गर्दी जमवण्यात कोण अग्रेसर ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या दसरा मेळाव्यात शिंदे गटाला भाजपा आणि मनसेची साथ मिळेल, असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पाठींबा मोलाचा ठरणार आहे. त्यातच खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे, यावरूनही दोन्ही गटांत संघर्ष सुरू आहे. याबाबत निर्णय घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची यावर आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने येत्या 7 ऑक्टोबर रोजी दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करायला सांगितले आहे.

- Advertisement -

यात विशेष असे की, एकीकडे धनुष्यबाण चिन्हावर फैसला होणे बाकी असताना दुसरीकडे शिवाजी पार्क आणि बीकेसीच्या एमएआरडीए मैदानात होणाऱ्या वेगवेगळ्या दसरा मेळाव्यात दोन गोष्टी सेम असणार आहेत. दोन्ही ठिकाणी मुख्य मंचावर धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा वापर होणार आहे. यासोबत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाचा वापर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून होणार आहे. अशातच दसरा मेळाव्यानंतर शिंदे गट निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्याची शक्यता आहे, कारण आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने येण्याची शक्यता शिंदे गटाला आहे.

धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आता दोन्ही गटांचे भवितव्य अवलंबून आहे. यात लवकरच अंधेरी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवर लिटमस टेस्ट असणार आहे. त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीतील विजय मिळवून कोणाच्या ‘धनुष्यबाणा’ने कोणत्या रावणाचं दहन होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हरियाणातील ‘ही’ तरुणी बनली भारतीय लष्करातील पहिली एकमेव महिला बॉक्सर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -