घरमुंबईसर्पमित्रांकडून 43 सापांची मुक्तता, केरळला गेलेल्या पथकाची कामगिरी

सर्पमित्रांकडून 43 सापांची मुक्तता, केरळला गेलेल्या पथकाची कामगिरी

Subscribe

पूरस्थिती ओसरल्यानंतर पुरासोबत वाहून आलेले साप घरात आणि गावात आश्रयाला आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

मुंबई : केरळमधील पूरस्थिती ओसरल्यानंतर देशभरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला. परंतु पूरस्थिती ओसरल्यानंतर पुरासोबत वाहून आलेले साप घरात आणि गावात आश्रयाला आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज (ओऊल) आणि सीस्केप या संघटनांचे सात सर्पमित्र केरळमधील नागरिकांच्या मदतीला रवाना झाले होते. या सात सर्पमित्रांनी 15 दिवसांमध्ये चार गावांमधून 43 सापांना पकडून त्यांना पुन्हा जंगलात सोडल्याने नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

केरळमधील पूर ओसरल्याने तेथे मनुष्य आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष उद्भवला होता. यासाठी वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया (डब्ल्यूआयटी) आणि वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. हे प्रयत्न करण्यासाठी वनविभागाची कुमक कमी पडत असल्याने महाराष्ट्रातील महाडमधून ‘ओऊल’ संस्थेचे अध्यक्ष गणेश मेहेंदळे आणि ‘सीस्केप’चे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सात तरुणांचे एक पथक कोचीला रवाना झाले होते. केरळमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पथकाने डब्ल्यूआयटी व वनविभागाच्या मदतीने ते तीन तुकड्यांमध्ये विभागले गेले. यातील दोन सपमित्रांची एक तुकडी अर्नाकुलम, अन्य दोन सर्पमित्रांची दुसरी तुकडी चलाकुडी व उर्वरित तीन सर्पमित्रांची तुकडी कोडनार येथे रवाना झाली. साप व अन्य वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांना वनविभागाशी संपर्क साधता यावा यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला होता. या हेल्पलाईनवर दररोज प्रत्येक विभागातून चार ते पाच असे एकूण 14 ते 15 दूरध्वनी येत असत. दूरध्वनी येताच हे सर्पमित्र तिकडे धाव घेत असत. 15 दिवसाच्या वास्तव्यात सर्पमित्रांच्या तुकडीने तब्बल 43 सापांची विविध भागातून सुटका केली. यामध्ये धामण, अजगर, नाग, घोणस, मांजर्‍या साप या विषारी सापांसह अनेक बिनविषारी साप होते, अशी माहिती सर्पमित्र चिंतन वैष्णव यांनी दिली.

- Advertisement -

केरळला गेलेल्या पथकामध्ये योगेश गुरव, चिंतन वैष्णव, कुणाल साळुंखे, प्रणव कुलकर्णी, चिराग मेथा, नितीन कदम आणि ओंकार वारणकर या सर्पमित्रांचा समावेश होता. अर्नाकुलम, चलाकुडी व कोडनार या भागामध्ये यशस्वी मोहीम राबवल्यानंतर हे सातजण एलप्पी जिल्ह्यामधील कुट्टानाड तालुक्यातील पुलींगकुनू, निडमुडी येथे गेले. पण या भागातील नागरिकांमध्ये हेल्पलाईनबाबत जनजागृती नसल्याने फारसे दूरध्वनी आले नसल्याचे चिंतन यांनी सांगितले.

अर्नाकुलम, चलाकुडी व कोडनार येथील दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणात दूरध्वनी येत होते. परंतु हा भाग 100 ते 150 किलोमीटर दूर असल्याने तेथे पोहचण्यास वेळ लागत असे. परिणामी अनेकदा साप, अजगर पाहिलेल्या ठिकाणाहून दुसरीकडे निघून जात असल्याने बर्‍याचदा फेरी फुकट जात असे. – चिंतन वैष्णव, सर्पमित्र

- Advertisement -

वनविभागामुळे त्रास कमी

केरळची भाषा मल्याळम असल्याने तिकडे जाताना आम्हाला भाषेची अडचण येण्याची भीती वाटत होती. परंतु वनविभागाच्या अधिकार्‍यांनी राखलेल्या समन्वयामुळे ही अडचण दूर झाली. तसेच तेथील सुशिक्षित तरुण हिंदीमध्ये बोलत असल्याने त्रास कमी झाला, अशी माहिती सर्पमित्र चिंतन वैष्णव यांनी दिली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -