घरमुंबईबेस्टनंतर एसटीचे कर्मचारी सोडणार तंबाखू

बेस्टनंतर एसटीचे कर्मचारी सोडणार तंबाखू

Subscribe

मॅजिक मिक्स पावडरचे पाच डेपोत वाटप

एसटी कर्मचार्‍यांमध्ये वाढते तंबाखूचे व्यसन ही गंभीर समस्या बनली आहे. त्यावर एसटी महामंडळाने याआधी शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले होते, तसेच ‘मी व्यसन करणार नाही’ असा बॉन्ड लिहून घेण्याचे निर्देशही माजी परिवहन मंत्री दिवकार रावते यांनी दिले होते, परंतु तरीही एसटी कर्मचारी तंबाखूच्या व्यसनापासून दूर गेले नाहीत. त्यामुळे आता एसटी महामंडळ बेस्ट उपक्रमाच्या धर्तीवर मॅजिक मिक्स पावडर तयार करणार आहे. त्यामाध्यमातून कर्मचार्‍यांना तंबाखूचे व्यसन सोडणे शक्य होणार आहे. नुकतेच एसटीच्या पाच डेपोंमध्ये त्याची चाचणी झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षात एसटी तंबाखू मुक्त होणार, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

एसटी महामंडळातील चालक, कंडक्टर वर्गाकडून पान, तंबाखू, सुपारीचे मोठ्या प्रमाणात सेवन होते. त्याचा परिणाम एसटीच्या बसगाड्यांबरोबर कार्यालयीन इमारती, बस आगार येथे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनी तंबाखूचे सेवन न करण्याचे आवाहन यापूर्वी अनेकदा करण्यता आले होते. इतकेच नव्हेतर कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आदेश देण्यात आले होते. त्याचबरोबर ‘मी व्यसन करणार नाही’ असा बॉन्ड लिहून घेण्याची घोषणाही माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. त्यानंतर रावते यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून ‘बेस्टप्रमाणे एसटीतील कर्मचार्‍यांना तंबाखू व्यसन सोडविण्यासाठी मॅजिक मिक्सचा फॉर्म्युला एसटी महामंडळाला कळवा, जेणेकरून एसटीतील कर्मचार्‍यांना व्यसन सोडण्यासाठी सहाय्य होईल’ अशी सूचना केली. याला बेस्टने सकारात्मक प्रतिसाद दिला.

- Advertisement -

बेस्ट प्रशासनाने मॅजिक मिक्सचा फॉर्म्युला तयार करणारे बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंघल यांना एसटीत पाचरण केले होते. डॉ. सिंघल यांच्या टिमने मुंबई सेंट्रल आगार, परळ आगार, कुर्ला आगार, पनवेल आगार आणि उरण आगार या पाच आगरांमध्ये मॅजिक मिक्सचे पावडर कसे तयार केले जाते, याची प्रात्यक्षिके दाखवले. मॅजिक मिक्स पावडरसुध्दा त्यांना देण्यात आली. एसटीतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी या मॅजिक मिक्सचा फॉर्म्युल्याला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्यभरात आता हा मॅजिक मिक्सचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे.

काय आहे मॅजिक मिक्स
मॅजिक मिक्समध्ये २५ ग्रॅम दालचिनी, २५ ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम ओवा, २५ ग्रॅम बडिशेप, ४ ते ५ लवंग याच मिश्रण करून पूड तयार होते. या पदार्थांच्या मिश्रणातून तयार झालेले चूर्ण हे दिसायला तंबाखूसारखे दिसते. तसेच हे चूर्ण खाल्यानंतर तंबाखू खाल्ल्याचे समाधान वापरकर्त्याला मिळते. मॅजिक मिक्सची पुडी किंवा डबी तंबाखूला पर्याय म्हणून वापरताना चुना म्हणून तांदळाचे पिठ देण्यात आले आहे. दिवसातून मॅजिक मिक्स २० ग्रॅमपेक्षा जास्त खायचे नाही. तसेच मॅजिक मिक्स चूर्ण थुंकण्याची गरज नाही, उलट हे गिळल्यास शरीरासाठी फायदाच आहे.

- Advertisement -

बेस्टमध्ये आम्ही मॅजिक मिक्सचा फॉर्म्युला यशस्वी राबविला आहे. यामुळे तंबाखूचे व्यसन असणार्‍या अनेकांचे समुपदेशन करून आतापर्यंत ५ हजार लोकांनी तंबाखू सोडली आहे. त्यामुळे माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते. त्यानुसार एसटीच्या पाच आगारंमध्ये हा उपक्रम राबविला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
-डॉ. अनिलकुमार सिंघल, मुख्य वैद्यकीय अधिकारी, बेस्ट उपक्रम

एसटीत अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्यात वाढणारे तंबाखूचे व्यसन पाहता माजी परिवहन मंत्री यांनी चांगले पाऊल उचलले होते. त्यांचे आम्ही स्वागत करतो, नव्या वर्षात मॅजिक मिक्सच्या पावडरमुळे एसटी तंबाखू मुक्त होईल, अशी आशा करतो.
– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -