घरमुंबईवसई पालिका परिवहन संपावर तोडगा निघेना

वसई पालिका परिवहन संपावर तोडगा निघेना

Subscribe

संप सुरुच, प्रवाशांचे हाल भाजप आंदोलन करणार

चौथ्या दिवशीही तिढा न सुटल्याने वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेचा संप सुरुच आहे. ठेकेदाराने अद्यापपर्यंत उर्वरित कामगारांचा पगार न दिल्याने तिढा अधिकच घट्ट झाला आहे. संपामुळे शहरवासियांचे हाल सुरू असून यावर त्वरित तोडगा न काढला गेल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपने दिला आहे.

दरमहिन्याला दहा तारखेला एकरकमी पगार आणि इतर मागण्यांसाठी मनसे कामगार संघटनेने मंगळवारपासून परिवहन सेवेचा संप पुकारला आहे. बुधवारी ठेकेदाराने 198 कामगारांना पगार दिला. परिवहनच्या सेवेत ठेकेदाराचे 700 कामगार आहेत. शुक्रवार उलटून गेला तरी ठेकेदाराने उर्वरित कामगारांचा पगार अद्याप दिलेला नाही. त्यामुळे कामगार संतप्त झाले आहेत. जोपर्यंत पूर्ण पगार मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. तर श्रमजीवी आणि बहुजन कामगार संघटनेच्या कामगारांनी आजही बस रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला. पण, प्रशासन आणि पोलिसांकडून संरक्षण न मिळाल्याने त्यांनीही काम करणे टाळले आहे. परिणामी शुक्रवारी चौथ्या दिवशीही संप सुरुच राहिला आहे.

- Advertisement -

वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा सुरु झाल्या दिवसापासून वादात आहे. धूर ओकणार्‍या प्रदूषणकारी व सामान्य नागरिकांच्या जीव घेणार्‍या बसेस, ठेकेदाराच्या मनमानीमुळे वाहतूक विभागाच्या परवानगीशिवाय चालणार्‍या बसेस, कर्मचा़र्‍यांची देणी न देणे, पगार वेळेवर न देणे यामुळे सतत वादात असणारी परिवहन सेवा मागील दोन महिन्यांपासून तिसर्‍यांदा बंद आहे. परंतु स्थानिक सत्ताधार्‍यांना त्याचे कोणतेच सोयरसुतक दिसत नसून, केवळ मनमानी करण्याच्या हट्टापायी हजारो प्रवाशांना गेले अनेक दिवस त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे.

मागील दोन महिन्यात परिवहन विभागातील कर्मचारी तिसर्‍यांदा संपावर गेले असून नेहमीप्रमाणे ठेकेदाराच्या आडमुठेपणा व त्याला स्थानिक सत्ताधा़र्‍यांचे पाठबळ यामुळे सामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. परिवहन सेवा सुरु करण्याचे श्रेय घेणारे स्थानिक सत्ताधारी तसेच वरिष्ठ नागरिकांना मोफत पास देण्याचे श्रेय घेणारे सभापती व नगरसेवक नक्की कोठे गायब आहेत. कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढून परिवहन सेवा तातडीने सुरु कारवाई व वसई पश्चिम व पूर्व भागातील तसेच शहरातील विद्यार्थी, महिला व सामान्य प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत. अन्यथा होणार्‍या प्रवाशाच्या उद्रेकाला महापालिका प्रशासन जबादार असेल, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रवाशासोबत रस्त्यावर उतरेल असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी परिवहन संपाची दखल घेतली आहे. ठेकेदाराला शुक्रवार संध्याकाळपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत त्याने कामगारांचे पूर्ण पगार द्यावेत. अन्यथा ठेेकेदाराच्या 130 बसेस जप्त करून त्या विकून कामगारांची देणी दिली जातील, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. तसेच शहरवासियांची गैरसोय टाळण्यासाठी डॉ. शिंदे यांनी एसटी महामंडळाशी थेट संपर्क साधून महापालिकेला 40 बसेस देण्याची मागणी केली आहे. तसे पत्र घेऊन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे पालघर येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात गेले आहेत. महापालिकेच्या स्वतःच्या 30 बसेस आणि एसटी महामंडळाच्या 40 बसेस घेऊन शहरवासियांना सेवा देणार आहे. त्याचबरोबर दुसरा ठेकेदार नेमण्याची प्रक्रियाही सुुरु केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -