घरक्रीडामुंबई शहरवर मात करत रत्नागिरी अजिंक्य

मुंबई शहरवर मात करत रत्नागिरी अजिंक्य

Subscribe

राजाभाऊ देसाई चषक कबड्डी

चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई शहरवर मात करत रत्नागिरीने अजिंक्यपद पटकावले होते. मुंबई शहर संघाला या पराभवाची परतफेड करण्याची स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आयोजित राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत संधी मिळाली. मात्र, यावेळीही ते अपयशी ठरले. मुंबईचाच पराभव करत रत्नागिरीने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील जनार्दन राणे क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीने मुंबई शहरचा ३७-३२ असा पराभव केला. या सामन्यात ९-९ अशी बरोबरी असताना अजिंक्य कापरे आणि ओंकार जाधव यांनी अप्रतिम चढाया करत मुंबईला १५-९ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, रोहन गमरेने २ आणि अजिंक्य पवारने ३ गुण टिपत रत्नागिरीला बरोबरीत करुन दिली. त्यांनी पुढेही चांगला खेळ सुरु ठेवल्याने मध्यंतराला रत्नागिरीकडे १९-१७ अशी आघाडी होती.

- Advertisement -

मध्यंतरानंतरही सामना चुरशीचा झाला. शेवटची सात मिनिटे शिल्लक असताना मुंबईचा संघ २६-२९ असा अवघ्या ३ गुणांनी पिछाडीवर होता. परंतु, तेव्हाच बदली खेळाडू म्हणून आत आलेल्या ओंकार कुंभारने चढाईत २ गुण मिळवले आणि त्यानंतर रत्नागिरीने अजिंक्य कापरेची पकड करून मुंबईवर लोण लादत ३३-२६ अशी निर्णायक आघाडी घेतली. यानंतर मुंबईला पुनरागमन करता आले नाही. त्यामुळे रत्नागिरीने हा सामना ३७-३२ असा जिंकत या स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत रत्नागिरीने रायगडचा ३२-२४ असा सहज पराभव केला. त्यांच्या विजयात रोहन गमरे, अजिंक्य पवार आणि शुभम शिंदे हे खेळाडू चमकले. दुसर्‍या लढतीत सुशांत साईल, अजिंक्य कापरेच्या दमदार खेळामुळे मुंबई शहरने ठाण्याला ५०-२३ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली.

- Advertisement -

अजिंक्य कापरे सर्वोत्तम चढाईपटू!
रत्नागिरीने राजाभाऊ देसाई चषक कबड्डी स्पर्धा जिंकली. त्यांच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा रोहन गमरे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा मानकरी ठरला. त्याने वेगवान चढायांबरोबर पकडींचाही अप्रतिम खेळ केला. मुंबईचा अजिंक्य कापरे सर्वोत्तम चढाईपटू, तर रत्नागिरीचा शुभम शिंदे सर्वोत्तम पकडीचा खेळाडू ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -