घरमुंबईसॅण्डहर्स्ट रोड स्थानकात विद्यार्थिनीने पाठलाग करून चोराला पकडले

सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात विद्यार्थिनीने पाठलाग करून चोराला पकडले

Subscribe

उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये महिला अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. महिलांच्या डब्यात चढलेल्या चोरट्याने एका विद्यार्थिनीसोबत झटापट करून तिचा मोबाईल फोन खेचून चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळ काढला. या विद्यार्थिनीने पाठलाग करून चोरट्याला इतर प्रवाशांच्या मदतीने पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. हा प्रकार घडला तेव्हा महिला डब्यात सुरक्षेसाठी एकही रेल्वे पोलीस नव्हता, अशी माहिती विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी ‘आपलं महानगर’ला दिली.

जयश्री मिस्त्री असे या बहाद्दर विद्यार्थिनीचे नाव असून ती वाडीबंदर परिसरातील चिचबंदरला आपल्या कुटुंबासह राहते. १७ वर्षांची जयश्री विलेपार्ले येथील एका कॉलेजात शिकते. कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनाचा सराव सुरू असल्याने तिला मागील काही दिवसांपासून घरी येण्यास उशीर होतो. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ती हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसटीच्या दिशेने जाणार्‍या ट्रेनच्या महिला डब्यातून प्रवास करीत होती. डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकात महिला डब्यात या विद्यार्थिनीला एकटे पाहून विशीतील एक तरुण डब्यात चढला आणि त्याने काही कळण्याच्या आत तिच्यावर हल्ला केला.

- Advertisement -

अचानक घडलेल्या या प्रकाराने ती विद्यार्थीनी हादरून गेली. तिनेही आपला रुद्रावतार दाखवला. तरीही चोरट्याने झटापट करत जयश्रीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्याने चालत्या गाडीतून सॅण्डहर्स्ट रोड स्थानकातील प्लॅटफॉर्मवर उडी घेतली. प्रसंगावधान राखून विद्यार्थीनीनेदेखील चालत्या गाडीतून उडी घेत त्याचा पाठलाग सुरू केला. हा प्रसंग अक्षरश: अचंबित करणारा होता. पाठलाग करताना ती चोर.. चोर.. ओरडत होती. तिच्या या आकांताने फलाटावरील प्रवासीही सावरले आणि तिच्यासह त्यांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केला. सगळ्यांनी त्या चोरट्याला पकडून फटकावले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेतून प्रवास करणार्‍या महिलांवर होणार्‍या हल्ल्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्याच आठवड्यात सॅण्डहर्स्टरोड स्थानकातच एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. या घटनेनंतर रेल्वेने प्रवास करणार्‍या महिलांची सुरक्षा वार्‍यावर असल्याची टीका झाली होती. त्यावेळी महिलांच्या डब्यात पोलीस नव्हता. मंगळवारच्या घटनेतही पोलीस डब्यात नसल्याची बाब उघड झाली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस निरीक्षक बारटक्के यांच्याकडे चौकशी केली असता, घटनेच्या दिवशी कुठल्या पोलीस शिपायाची अथवा होमगार्डची ड्युटी होती याची माहिती घेतली जात आहे. ते डब्यात का नव्हते, याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

आरोपीस अटक

हसीब अख्तर शेख, वय-20 वर्षे असे ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून तो मालाड येथे राहणारा आहे. वडाळा रेल्वे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी ‘आपलं महानगर’ला दिली.

डब्यात पोलीस नव्हते

माझी मुलगी विलेपार्ले पूर्व येथील कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत आहे. कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनाचा सराव सुरू असल्याने ती दोन तीन दिवसांपासून कॉलेजमधून उशिरा घरी येते. घटनेच्या दिवशी मंगळवारी तिला उशीर झाला. ज्या रात्री हा प्रकार घडला तेव्हा महिला डब्यात एकही पोलीस नव्हता. पोलीस असते तर कदाचित हा प्रकार घडला नसता, असे विद्यार्थिनीच्या पालकांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -