घरमुंबईसर्वोच्च न्यायालयाचा शिक्षकांना ‘आधार’

सर्वोच्च न्यायालयाचा शिक्षकांना ‘आधार’

Subscribe

आधार सक्ती काढल्यासंदर्भात शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये आनंद

मुंबई : संचमान्यतेसाठी आधार सक्तीची करून शिक्षकांवर अविश्वास दाखवणार्‍या राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून चपराक लगावण्यात आल्याची प्रतिक्रिया शिक्षक व मुख्याध्यापकांनी दिली आहे. संचमान्यतेसाठी आधार सक्तीमुळे शिक्षकांना नोकरी वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांची आधार कार्ड काढण्यासाठी दारोदारी फिरावे लागत होते. तसेच शैक्षणिक कामाकडेही दुर्लक्ष होत होते. न्यायालयाने आधार सक्ती हटवल्याने राज्यातील शिक्षकांना न्यायालयाचा आधार मिळाला आहे. शाळा प्रवेशासाठी आधार अनिवार्य करणे चुकीचे असल्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षक व मुख्याध्यापकांनी आनंद व्यक्त केला आहे.

तुकडी संकल्पनेवर पूर्वी संचमान्यता ठरत होती. परंतु, शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता ठरवण्यात येऊ लागली. ही संचमान्यता ठरवताना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले होते. त्यानुसार शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची प्रत जमा केली असली तरी शिक्षकांकडून विद्यार्थी संख्येत अफरातफर करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांना ग्राह्य धरण्यात येत नव्हते. आधारकार्ड लिंक करण्यासंदर्भात सोप्या पद्धतीचा अवलंब करण्याऐवजी शिक्षकांवर अविश्वास दाखवण्यात येत होता. परिणामी नोकरीवर गदा येऊ नये व बदली होऊ नये यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी दारोदार फिरावे लागत होते. तसेच आधार कार्ड केंद्र शोधण्यासाठीही वणवण करावी लागत होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा शिक्षकांचा विचार करूनच घेतलेला आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली. शिक्षकांच्या मागची आधारकार्ड काढण्यासाठीची वणवण संपल्यामुळे आता ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन त्यांची उजळणी घेऊ शकतात. तसेच आधारकार्डवरून पालक व शिक्षकांमध्ये होणारे वाद कमी होतील, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले आधार कार्ड वगळल्याने शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. शाळांच्या संचमान्यतेसाठी आधार सक्तीचे केल्यामुळे त्याचा परिणाम संचमान्यतेवर होऊन शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रकार वाढले होते. तसेच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे अशैक्षणिक कामाचा शिक्षकांवर पडलेला बोजा कमी होण्यास मदत होईल.
-अनिल बोरनारे,अध्यक्ष, शिक्षक परिषद मुंबई उत्तर विभाग.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -