घरमुंबईराज्यात लवकरच कलेचे पहिले अभिमत विद्यापीठ

राज्यात लवकरच कलेचे पहिले अभिमत विद्यापीठ

Subscribe

जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा यूजीसीकडे प्रस्ताव

देशासह परदेशातही आपल्या कलेचा ठसा उमटवणार्‍या मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे लवकरच अभिमत कला विद्यापीठामध्ये (डीम्ड युनिव्हर्सिटी)रुपांतर होणार आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट कॉलेजला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर राज्यामध्ये कलेचे पहिले अभिमत विद्यापीठ सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट आणि जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अशा तीन कॉलेजांचे मिळून अभिमत कला विद्यापीठ बनवण्याबाबतचा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये राज्य कला संचालनालयाकडून यूजीसीला पाठवण्यात आला होता. मात्र यावर यूजीसीने विद्यापीठ मान्यतेसंदर्भात संकेतस्थळ सुरू करण्यात येणार असून, त्यामार्फत प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना संचालनालयाला दिल्या होत्या. मात्र संकेतस्थळाऐवजी ऑफलाईन प्रस्तावालाच मान्यता द्यावी यासाठी संचालनालयाकडून आग्रह धरण्यात आला होता. त्यामुळे जे.जे. स्कूल ऑफ आर्टला अभिमत विद्यापीठाची परवानगी रखडली होती.

- Advertisement -

अखेर 1 मार्चला 2020 रोजी यूजीसीकडून विद्यापीठ मान्यतेसंदर्भातील संकेतस्थळ सुरू झाल्याने जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यापीठाची मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असल्याने या कॉलेजच्या विकासासाठी फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. तसेच कला कॉलेजमधील प्राध्यापक व शिक्षकांसाठी फारशा सोयी-सुविधाही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांचा जगात डंका असला तरी त्यांना शिक्षण घेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जे.जे. स्कूल ऑफ आर्टला विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास कलेचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा मिळण्यास मदत होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली.

जे.जे.मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम
जे.जे.स्कूल ऑफ आर्ट विद्यापीठाला मान्यता मिळाल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम बनवणे शक्य होईल. जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिक उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्यास मदत होईल. कला संचालनालयाच्या संकुलामध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये 250 विद्यार्थी, जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये 400 तर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये 350 असे तब्बल 900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

- Advertisement -

राज्यातील कला कॉलेजांना करणार संलग्न
राज्यामध्ये कलेचे शिक्षण देणारी नऊ कॉलेजेस आहेत. यामध्ये खासगी पाच व सरकारी चार कॉलेज आहेत. जे.जे. स्कूल ऑफ आर्टला विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यावर या कॉलेजांना संलग्न करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे कलेचे शिक्षण देणारी कॉलेज सुरू करण्यावर भर देण्यात येईल. जेणेकरून कलेचे प्रचार व प्रसार करण्यास मदत होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली.

जे.जे स्कूल ऑफ आर्टला विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडूनही मंजुरी मिळाली असून, याबाबतचा प्रस्तावही यूजीसीला पाठवला आहे. मागील सरकारने या विद्यापीठासाठी तब्बल 150 कोटींची तरतूदही केली असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे या विद्यापीठासाठी आग्रही आहेत.
– राजीव मिश्रा, कला संचालक, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -