घरमुंबईचाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी दिशा कायद्यात विशेष तरतूद करणार

चाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी दिशा कायद्यात विशेष तरतूद करणार

Subscribe

गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

बालकांवरील लैंगिक अत्याचार (चाईल्ड पोर्नोग्राफी) रोखण्यासाठी दिशा कायद्यात विशेष तरतूद करण्यात येईल, तसेच दंडाची रक्कम वाढविण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत केली. भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या लक्षवेधीवरही घोषणा करण्यात आली.

चाईल्ड पोर्नोग्राफीकडे लक्ष वेधीत आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी याबाबत सरकार करत असलेल्या उपाययोजना याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, दि नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अ‍ॅण्ड एक्सप्लोइट चिल्ड्रेन (एनसीएमइसी) ही आंतराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था पिडीत बालकांसाठी सक्रीयपणे काम करीत असून भारतातील सोशल मिडीयावर ऑनलाईन लैंगिक बाल अत्याचार ध्वनिचित्रफिती (व्हिडीओ) प्रसारित करणार्‍या इसमांची माहिती ध्वनिचित्रफिती सह या संस्थेने दि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) यांसकडे पाठविली आहे.

- Advertisement -

दि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नवी दिल्ली यांनी जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत त्यांच्याकडील प्राप्त टीपलाईनच्या ऑनलाईन लैंगिक बाल अत्याचार ध्वनिचित्रफिती प्रसारित करणार्‍या इसमांची माहिती ध्वनिचित्रफितीसह महाराष्ट्र सायबर कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्या आहेत. यामध्ये एकूण १६८० चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भातील टीपलाईन्स ध्वनिचित्रफितीसह माहिती उपलब्ध करून दिली आहे.

सदरच्या टीपलाईन्स ध्वनिचित्रफितीसह बाबतच्या माहितीचे महाराष्ट्र सायबरकडून अवलोकन व वर्गीकरण करण्यात आले आहे व त्यामध्ये संशायीतांचे प्रोफाईल नेम, जीयोग्राफीकल लोकेशन, आयपी एड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादीबाबत माहिती उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. सदर सीडीजमधील १६८० चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भातील टीपलाईन्स ध्वनिचित्रफितीसह बाबतची माहिती १८ डिसेंबर २०१९ रोजी सीलबंद सीडीसह मुंबईसह १० आयुक्तालये व २९ जिल्हा घटक प्रमुखांना पुढील कायदेशीर कारवाई करिता स्वाधीन करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान या चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब गंभीर असून याबाबत मोनेटरिंगसाठी स्वतंत्र यंत्रणा राज्याची असावी, अशी मागणी केली. तसेच आमदार अ‍ॅड.आशिष शेलार यांनी कायद्याचे स्वतंत्र प्रावधान असावे, कायद्यात दंडाची रक्कम वाढविण्यात यावी व पिडीत मुलांच्या पुनर्वसन व समुपदेशनाची यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली, त्या गृहमंत्र्यांनी मान्य केल्या. या चर्चेत आमदार राम कदम, योगेश सागर आदीही सहभागी झाले.

राज्यभरात ३४ गुन्हे दाखल
त्याचप्रमाणे पुणे, रायगड, नाशिक, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, परभणी, बीड, भंडारा, चंद्रपूर, नंदुरबार येथे चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात एकूण ३० गुन्हे दाखल केले असून १६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. नवी मुंबई आयुक्तालयाकडून चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (ब) अन्वये कायदेशीर कारवाई केलेली असून एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले असून ३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -