घरमहाराष्ट्रप्रदूषणास कारणीभूत ५० कंपन्यांना नोटीस

प्रदूषणास कारणीभूत ५० कंपन्यांना नोटीस

Subscribe

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ६०७ उद्योगांपैकी ३११ कंपन्यांचा सर्व्हे केला असून, मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणार्‍या ५० औद्योगिक कंपन्यांना नोटीस देण्यात आली असून, २१ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. या कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी बाहेर सोडून देत होत्या. यापुढेही अशा औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत जाहीर केले.

कल्याण-डोंबिवली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कारखान्यांमुळे होत असलेल्या वायु प्रदुषणासंदर्भात सदस्य गणपत गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री ठाकरे बोलत होते. कोणत्याही औद्योगिक कंपन्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी हे प्रक्रिया होऊनच बाहेर सोडले जाणे सक्तीचे आहे. असे न केल्यास संबंधित उद्योगांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेचे आधुनिकीकरण लवकरच करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेस जे अनधिकृतरित्या डंम्पींग करतात त्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी पथक नेमण्यात आले आहेत. याचबरोबर नगरविकास आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

याचबरोबर मौजे शेलार येथील बेकायदेशीर कारखान्यांमुळे होत असलेल्या प्रदुषणाबात शांताराम मोरे यांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना मंत्री ठाकरे म्हणाले, या परिसरातील दोन कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. दोन कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. चार उद्योगांना प्रस्तावित आदेश बजावण्यात आले आहेत. या कंपन्यात कामगार काम करत असतात त्यामुळे त्या पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, मात्र त्याकरता त्या कंपन्यांना नियमांचे पालन करणे सक्तीचे असणार आहे, असेही मंत्री ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -