घरमुंबईआरोग्य समिती अध्यक्षपदाची निवडणूक ठरली वादग्रस्त

आरोग्य समिती अध्यक्षपदाची निवडणूक ठरली वादग्रस्त

Subscribe

महापौरांनी हातचलाखी करून राजुल पटेल यांना विजयी घोषित केल्याचा गंभीर आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. 

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या राजुल पटेल यांना १६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या बिंदू त्रिवेदी यांना ११ मते मिळाली, अशी माहिती देत पीठासीन अधिकारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजुल पटेल यांना विजयी घोषित केले. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेची ५ मते अवैध ठरली आणि त्यांचा १ सदस्य गैरहजर राहिला असल्याने शिवसेनेच्या उमेदवार राजुल पटेल यांना ११ मते, तर भाजप उमेदवार बिंदू त्रिवेदी यांनाही ११ अशी समान मते मिळाली असताना महापौरांनी हातचलाखी करून राजुल पटेल यांना विजयी घोषित केल्याचा गंभीर आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

भाजप सदस्यांचा सभात्याग   

या गंभीर घटनेनंतर भाजप सदस्यांनी महापौरांकडे निकालाची प्रत बघायला मागूनही त्यांनी ती दाखवली नाही. त्यामुळे आरोग्य समितीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाजप सदस्यांनी बहिष्कार टाकून सभात्याग केला, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. तसेच, याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे ही निवडणूक वादग्रस्त ठरली आहे. आरोग्य समितीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार वसंत शिवराम नकाशे हे १७ मते मिळवून विजयी झाले. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार प्रियांका प्रफुल्ल मोरे यांना शून्य मते (भाजप सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने) मिळाली.

- Advertisement -

बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदी प्रतिमा खोपडे

महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेच्‍या उमेदवार प्रतिमा शैलेश खोपडे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तुकाराम पाटील हे बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत प्रतिमा खोपडे यांना १८ मते त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या साक्षी दळवी यांना ११ मते मिळाली. त्यामुळे प्रतिमा खोपडे यांना विजयी घोषित करण्यात आले. तसेच, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे तुकाराम पाटील यांना १८ मते, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या रजनी केणी यांना ११ मते मिळाली. त्यामुळे अधिकची ७ मते मिळाल्याने तुकाराम पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -