घरमुंबईखोटी कागदपत्रे देऊन एसटी बँकेत मिळवली नोकरी

खोटी कागदपत्रे देऊन एसटी बँकेत मिळवली नोकरी

Subscribe

पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या नातेवाइकाची कागदपत्रे सादर करून अशिक्षित व्यक्तीने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेत शिपायाची नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून दाऊद शेख 16 वर्षांपासून बँकेत नोकरी करत होता. कागदपत्रे असलेल्या व्यक्तीच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे तब्बल 90 हजार एसटी कर्मचारी सभासद असलेल्या बँकेतील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या राज्यभरात ५० शाखा असून ११ विस्तार केंद्रे कार्यरत आहेत. 90 हजार एसटी कर्मचारी या बँकेचे सभासद आहे. एसटी कर्मचार्‍यांचे पूर्ण व्यवहार या बँकेतून चालतात. जालना पोलीस खात्यामध्ये कराटे प्रशिक्षक म्हणून खालेद शेख कार्यरत आहे. त्याचा नातेवाईक असलेला दाऊद शेख हा जालना एसटी बँकेच्या शाखेत शिपायाच्या हुद्यावर 1६ वर्षांपूर्वी लागला होता.

- Advertisement -

नोकरी मिळवण्यासाठी दाऊदने एसटी बँकेची दिशाभूल करत खालेद शेखची कागदपत्रे सादर केली होती. १५ वर्षांपासून जालना येथील एसटी बँकेच्या शाखेत कार्यरत होता. 2018 मध्ये त्याची बदली औरंगाबादच्या शाखेत करण्यात आली आहे.
जानेवारीमध्ये खालेद जेव्हा जालना आला त्यावेळी त्याला दाऊद हा आपल्या नावाने बँकेमध्ये नोकरी करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यासंदर्भात त्याने लगेचच जालना शाखेकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

खालेद हा जालना पोलीस खात्यात कराटे प्रशिक्षक असल्याने त्याला नेहमी बाहेर राहावे लागते. खालेद काही कामानिमित्त जालनामध्ये आला असता त्याला दाऊद हा खालेद शेख या आपल्या नावाने बँकेत नोकरी करत असल्याचे कळले. त्यामुळे त्याने तातडीने पत्र लिहून ही बाब बँकेच्या शाखा व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली. खालेदने लेखी तक्रार केल्याने एसटी बँकेने चौकशीचे आदेश देत या प्रकरणासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमला. दाऊद शेख हा अशिक्षित असून दाऊद व खालेद यांच्यातील संगनमतानेच ही कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. दोघांमध्ये झालेल्या भांडणामुळे ही तक्रार केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र प्रकरणाची खरी माहिती चौकशीचा अहवाल समोर आल्यावरच कळेल असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

एस.टी.बँकेत वारंवार अनुचित घटना घडत आहेत. बँक प्रशासन त्या रोखण्यात कुचकामी ठरले आहे. त्यामुळे बँकेवरचे संचालक मंडळ बरखास्त करून तात्काळ प्रशासक नेमावा.
– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉँग्रेस

खालेद शेखच्या तक्रारीवर आम्ही चौकशी अधिकारी नेमला आहे. हा अधिकारी जालना व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी जाऊन तपास करणार आहे. चौकशीत दाऊद दोषी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
– श्रीकांत अनंतपुरे, व्यवस्थापकीय संचालक, स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँक

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -