घरमुंबईCorona : वरळीत कोरोना रोखण्यात महापालिका प्रशासन पडले ‘उघडे’!

Corona : वरळीत कोरोना रोखण्यात महापालिका प्रशासन पडले ‘उघडे’!

Subscribe

महापालिका आयुक्त आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या विभागात अधिक लक्ष घालून याचा संसर्ग रोखण्यासाठी वेगळ्याप्रकारचा कृती आराखडा आखण्याची वेळ आली असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने होत असले तरी वरळी, प्रभादेवी या जी-दक्षिण विभागात महापालिका प्रशासन उघडे पडल्याचे दिसून येत आहे. जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांना परिस्थिती नियंत्रणात आणताना पुरता घाम फुटला आहे. आजवर केवळ मंत्र्यांची पाठराखण करत त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या उघडे यांना मंत्री आणि महापौर यांच्या शिवाय अन्य कुठे लक्ष द्यायलाच वेळ नाही. विभागातील रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्याची रणनिती आखण्याऐवजी उघडे हे केवळ मंत्री आणि महापौरांभोवतीच घुटमळून प्रतिबंधात्मक उपाययोजना राखण्याकडे विशेष लक्ष देत नसल्याने तसेच काळजी घेत नसल्यामुळेच येथील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बोलले जात आहे.

क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्यांना करावा लागतोय गैरसोयींचा सामना

संपूर्ण मुंबईत कोरोनाचे मंगळवारपर्यंत एकूण ५९९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आहेत. यामध्ये एकट्या जी-दक्षिण विभागात १३३ रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी ५५ रुग्ण वाढले आहे. वरळीतील कोळीवाडा, आदर्श नगर, जनता नगर, जिजामाता नगर, पोलिस वसाहत, वरळी बीडीडी चाळ तसेच प्रभादेवी येथील दया विरा इमारतीत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोळीवाड्यासह जिजामाता नगर,जनता नगर झोपडपट्टीचा परिसर सिल करतानाच येथील काही इमारतीही सिल करत त्यांना बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कोळीवाड्यास जिजामाता नगर आदींमधील रहिवाशांना येथील पोद्दारच रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. परंतु पहिल्या दिवसांपासून क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

आता पालिका संशयित रुग्णांच्या घरी जाऊन गोळा करणार नमुने!

वाढणाऱ्या रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यावर अपयश

वरळी विधानसभेचे आमदार हे युवा सेनेचे अध्यक्ष व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आहेत. त्यामुळे जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे हे केवळ आदित्य ठाकरेंची मर्जी संपादन करण्यासाठीच त्यांच्या सांगण्यानुसार काम करत असल्याची चर्चा सर्व विभागात आहे. तसेच महापौर किशोरी पेडणेकर याही याच विभागातील असल्यामुळे शरद उघडे हे केवळ आदित्य ठाकरे यांच्याच संकल्पसिध्दीसाठी झटत असल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी शरद उघडे हे एच-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त असताना तिथेही त्यांनी तत्कालिन भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांची मर्जी संपादन करत त्यांची सावली म्हणून काम केले होते. त्यानंतर शेलार हे मंत्री बनल्यानंतर उघडे यांचा स्काऊट गाईडच्या मंडळावर वर्णी लावली होती. मात्र, त्यानंतर आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळताच ते जी-दक्षिण विभागात बदली करून घेण्यात यशस्वी ठरले होते. शरद उघडे हे कुशल प्रशासक असले तरी त्यांनी आपल्या कामाची पध्दतीतच बदल करत केवळ लोकप्रतिनिधी व मंत्र्यांची मर्जी संपादन करत काम करणे हीच पध्दती अंगिकारली आहे. त्यामुळेच वरळीत आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार काम करणाऱ्या उघडे यांना विभागात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे.

संसर्ग रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची वेळ

उघडे यांच्या जी-दक्षिण बरोबरच त्यांचे जीवलग मित्र असलेल्या किरण दिघावकर आणि प्रशांत गायकवाड यांच्या अनुक्रमे जी-उत्तर व डि विभागातही रुग्ण वाढत आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आतापर्यंत ७ रुग्ण आढळून आले आहे. मात्र, या झोपडपट्टीत याचा ससर्ग होवू नये म्हणून दिघावकर यांनी सर्व शक्तीपणाला लावली आहे. त्यामुळे त्यांनी आपले लक्ष धारावीतच केंद्रीत केले आहे. तर डि विभागात आतापर्यंत ४७ रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये झोपडपट्टी, चाळ तसेच इमारतींचाही सामावेश आहे. परंतु गायकवाड यांनी कस्तुरबा रुग्णालयातून चाचणी अहवाल येताच संबंधित रुग्णाचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करून उपाययोजना राबवण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच आतापर्यंत या दोन्ही विभागांमध्ये सहायक आयुक्त ज्याप्रकारे कामे करता, त्यातुलनेत शरद उघडे हे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. परिणामी या भागातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकाधिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या विभागात अधिक लक्ष घालून याचा संसर्ग रोखण्यासाठी वेगळ्याप्रकारचा कृती आराखडा आखण्याची वेळ आली असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -