घरमुंबईसभागृहातील कोसळलेल्या छताच्या दुरुस्तीला मुहूर्तच मिळेना

सभागृहातील कोसळलेल्या छताच्या दुरुस्तीला मुहूर्तच मिळेना

Subscribe

कोट्यवधींचे बजेट असलेल्या केडीएमसीची स्थिती

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एकवीसशे कोटींच्या अंदाजपत्रकाला गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, ज्या सभागृहात बसून नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. त्या सभागृहाचे छत कोसळून तब्बल दीड वर्षे उलटली. मात्र, त्याच्या दुरुस्तीला प्रशासनाला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पहावयास मिळत आहे.

केडीएमसी मुख्यालयातील वि.दा. सावरकर सभागृहाचे पीओपीचे संपूर्ण छत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळले होते. 13 जुलै 2017 ला हा प्रकार घडला हेाता. मध्यरात्री ही घटना घडल्याने सभागृह बंद होते. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, टेबल खुर्च्यांसह नगरसेवकाच्या डेस्क व विजेच्या साहित्यासह इतर सामानाचे मोठे नुकसान झाले होते. 2001 साली हे सभागृह बांधण्यात आले आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून इमारतीच्या छताला गळती लागली होती. त्यामुळे छताची पीओपी कमकुवत झाली आहे. मात्र, अजूनही छताची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. सभागृहातील कोसळलेल्या छताखाली बसूनच पालिकेतील 122 नगरसेवक विकासासाठी झगडत असतात. मात्र, ते कोसळलेले छत ना प्रशासनाला दिसत आहे, ना सत्ताधार्‍यांना. प्लास्टर कोसळल्याने हे छत आणखीनच कमकुवत झाले आहे. त्यामुळे छताची त्वरित डागडुजी करणे महत्त्वाचे आहे, पण दीड वर्षानंतरही छताची डागडुजी करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍याची केबिन्स, त्यांच्या सजावटीवर दरवर्षी पालिकेकडून लाखो रुपयांची उधळण केली जाते, पण छताची डागडुजी होत नसल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

सभागृहातील छताच्या कामाचे टेंडर काढण्यात आले असून, संबंधित कंत्राटदाराला वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. छताच्या कामासाठी सभागृह बंद ठेवावे लागणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महासभा होणार नसल्याने सभागृह बंद राहणार आहे, त्यामुळे त्यावेळीच सभागृहाच्या छताच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल.
-रघुवीर शेळके, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -