घरमुंबईआज बस धावणार?

आज बस धावणार?

Subscribe

आजच्या दिवशी अंशत: बस धावणार असल्याची माहिती मिळत आहे. कंत्राटी कामगारांच्या मदतीनं या बस धावणार आहेत.

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या बसच्या संपामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले आहेत. अद्यापही बेस्टचा संप सुरूच आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. पण, आजच्या दिवशी अंशत: बस धावणार असल्याची माहिती मिळत आहे. कंत्राटी कामगारांच्या मदतीनं या बस धावणार आहेत. कामगार संघटना आणि प्रशासनातील बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यानं संप अद्यापही कायम आहे. दरम्यान, कामावर हाजीर व्हा असे आदेश बेस्ट प्रशासनानं बेस्ट कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे कर्मचारी आता काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. बेस्ट कामगार सेनेनं मात्र या संपातून माघार घेतली आहे. आज ५०० बसेस रस्त्यावर धावणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच दिसत आहे.

शिवसेनेची माघार

शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेनं संपातून माघार घेतली होती. कामगार सेनेचे ११ हजार कर्मचारी कामावर रुजू होणार होते मात्र कर्मचाऱ्यांनीच कामावर जाण्यास नकार दिला आहे. शिवसेनेच्या संघटनेत असलेला बेबनाव समोर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या निर्णयामुळे शिवसेना तोंडावर आपटण्याची चिन्हे आहेत. शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेच्या सभासद, कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर, आणिक, वांद्रे आगारातील काही सभासदांनी राजीनामे दिले आहेत.

- Advertisement -

रिक्षा, टॅक्सीवर मदार

बेस्टनं पुकारलेल्या संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांची, चाकरमान्यांची मदार ही रिक्षा आणि टॅक्सीवर आहे. सकाळपासूनच रिक्षा आणि टॅक्सीला मोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे. बेस्ट रस्त्यावर नसल्यानं अनेकांनी शक्य तेवढ्या जवळचा प्रवास हा पायी करणं पसंत केलं. दरम्यान, बेस्ट धावणार केव्हा? असा सवाल आता मुंबईकरांना पडला आहे. तसेच आम्ही का भरडायचं? असा सवाल देखील आता मुंबईकर करत आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोवर माघार नाही असा आक्रमक पवित्रा बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल दुसऱ्या दिवशी देखील कायम आहेत. सध्या तरी मुंबईकरांना बेस्ट केव्हा धावणार? असा प्रश्न पडला आहे. कारण बेस्ट आणि प्रशासनाच्या वादात भरडला जातोय तो मात्र सामान्य मुंबईकर!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -