घरमुंबईफटाक्यांच्या आवाजानेही आता भिती वाटते

फटाक्यांच्या आवाजानेही आता भिती वाटते

Subscribe

अभिनेत्री सोनाली खरे हिने व्यक्त केल्या भावना

२६/११ च्या मुंबई हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी आजही या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात कायम आहेत. या हल्लाच्यावेळी अनेकजण ताज हॉटेलमध्ये अडकले होते. त्यातलीच एक अभिनेत्री सोनाली खरे. तब्बल 10 वर्ष उलटल्यानंतरही त्या सगळ्या आठवणी, ते क्षण खूप ताजे असल्याची भावना सोनालीने व्यक्त केली. 26/11 च्या हल्ल्याची घटना हृदयावर इतक्या खोलवर घर करून बसली आहे की, आज फटाक्याचा आवाज झाला तरी खूप भीती वाटते. त्यामुळे या हल्ल्यानंतर आम्हाला पुर्नजन्म मिळाला असल्याची भावना सोनाली खरे हिने ‘दैनिक आपलं महानगर’कडे व्यक्त केली.

२६ नोव्हेंबरला मी माझ्या पतीसोबत ताज हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यावेळी माझी चार महिन्यांची मुलगी कामवालीसोबत घरीच होती. तिथे गेल्यावर अचानक गोळ्यांचे आवाज यायला लागले. सुरूवातील फटाक्यांचे आवाज समजून आम्ही दुर्लक्ष केले. मात्र अचानक अनेकजण धावताना दिसले. आम्ही पटकन दरवाजा बंद केला. लोकांचे आवाज येत होते. दरवाजे बंद करा, बाहेर मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे. हा गोंधळ सुरू असतानाच घरातून आलेल्या फोनमुळे आम्हाला बाहेर दहशतवादी हल्ला झाल्याचे कळले आणि आपण खूप मोठ्या संकटात अडकल्याची जाणीव झाली.

- Advertisement -

आम्ही रेस्टॉरन्टच्या प्रवेशद्वाराजवळच होतो. त्यामुळे तेथून ताबडतोब बाहेर पडावे, असा एक विचार आमच्या मनात आला. पण बाहेरून येणार्‍या गोळ्यांच्या आवाजामुळे दहशतवादी नेमके कोठेही असतील. यामुळे तो निर्णय आम्ही बाजूलाच ठेवला. त्या रेस्टॉरन्टला लागून असलेल्या बारचा दरवाजा बंद होता. तो दरवाजा उघडून बारमधून बाहेर पडू, असे वाटत होते. पण हॉटेलचा स्टाफ कोणालाच ही जोखीम घेऊ देत नव्हता. तिथे एक मॅनेजर मुलगी होती ती म्हणाली, जायचे असेल तर मी पुढे जाईन. तेवढ्यात तिथे एक माणूस आला. तो म्हणाला तुम्ही चेंबरमध्ये चला. पण का कोण जाणे, मला तिथे जावसे वाटत नव्हते. नवर्‍यानेही यावेळी माझे ऐकले. आम्ही तिथेच थांबलो.

रात्रभर गोळ्यांचे आवाज सुरूच होते. पहाटे त्यांनी डोमला आग लावल्यामुळे त्याची धग खालपर्यंत जाणवत होती. माझ्या नवर्‍याची पोलिसांत ओळख होती. त्याने पोलिसांनी फोन करून आम्ही साधारण ३५ जण इथे अडकल्याची माहिती दिली. पहाटे पोलिसांनी आमची सुटका केली. हॉटेलच्या दरवाज्यातून बाहेर पडल्यावर रात्रभर काय घडले याची कल्पना आम्हाला आली. हॉटेलबाहेर रक्ताच्या थारोळ्यात अनेकजण पडलेले होते. त्यावेळी लॉबीमधील दृश्य मी कधीच विसरू शकत नाही. ज्या जवानांनी आम्हाला वाचवले त्या जवानांचा चेहराही मी कधीच विसरू शकत नाही. ती रात्र आठवली की आजही अंगावर काटा येतो. त्या घटनेनंतर ताज हॉटेलमध्ये जायची भीती वाटू लागली. पण ही भीती घालवण्यासाठी आम्ही मुद्दाम तेथे पुन्हा गेलो. तिथल्या कर्मचार्‍यांना भेटलो. आजही आम्ही ताज हॉटेलमध्ये गेल्यावर तेथील कर्मचार्‍यांची जाणीवपूर्वक भेट घेतो.

- Advertisement -
देशाचे रक्षण आपलीही जबाबदारी

26/11 च्या हल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. स्वत:च आणि देशाचे रक्षण करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर ती आपली ही जबाबदारी आहे. आजही कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर सुरक्षित वाटत नाही. सतत २६ नोव्हेंबरची ती रात्र आठवते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -