घरमुंबईराज्यात ६,७६५ नवीन पेट्रोल पंप

राज्यात ६,७६५ नवीन पेट्रोल पंप

Subscribe

१,१५३ पेेट्रोल पंप ग्रामीण भागात देणार

राज्यात आगामी काही वर्षांत ६ हजार ७६५ नवीन पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहेत. त्यातील १ हजार १५३ जागा ग्रामीण भागात उभारण्यात येणार आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून पेट्रोल पंप डिलरशीपसाठी घोषणा करण्यात आली. नियमित डिलरशीप आणि ग्रामीण डिलरशीप अशा दोन पद्धतीने संपूर्ण राज्यात डिलरशीप देण्यात येणार आहे.

एकूण ६ हजार ७६५ पेट्रोल पंपाच्या जागांपैकी ५ हजार ६१२ रेग्युलर पेट्रोल पंपसाठी तर १ हजार १५३ जागा ग्रामीण भागासाठी असणार आहेत. गेल्या चार वर्षात एकाही नवीन पेट्रोल पंपाच्या जागेला मान्यता देण्यात आली नव्हती. दिवसेंदिवस वाढणारी डिझेल आणि पेट्रोलची गरज पाहता येत्या चार वर्षांमध्ये या पेट्रोल पंपची उभारणी होईल, अशी अपेक्षा आहे. आगामी वर्षांमध्ये वाहनांची वाढती संख्या आणि इंधनाचा वापर लक्षात घेऊनच इतक्या मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहेत. सध्या महाराष्ट्रात ५ हजार २०० पेट्रोल पंप आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील पेट्रोल, डिझेलची मागणी लक्षात घेऊनच या पेट्रोल पंपची उभारणी करण्यात येणार आहे. रेग्युलर आणि रिटेल आऊटलेटसाठीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जकर्त्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील तसेच संपूर्ण प्रक्रियेची स्थिती ऑनलाईन पाहता येईल, अशी माहिती ऑईल इंडस्ट्रीचे राज्यस्तरीय समन्वयक संतोष निवेंदकर यांनी सांगितले.

- Advertisement -

पेट्रोल पंपचे ऑटोमेशन

पेट्रोल पंप आऊटलेटसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पेट्रोल पंप आऊटलेटवर अधिक पारदर्शक कारभारासाठी ऑटोमेशनचा वापर करण्यात येणार आहे. ऑटोमेशनमुळे पेट्रोल पंपच्या ठिकाणी इंधनाचा साठा आणि वितरण यासारख्या तपशीलाचे मॉनिटरींग करणे, नियंत्रण ठेवणे इंधन पुरवठादार कंपन्यांना शक्य होणार आहे. ऑटोमेशन सोबतच सीसीटीव्हीचा वापरही पेट्रोल पंप आऊटलेटवर होणार आहे.

इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही

इलेक्ट्रिक व्हेईकलची संख्या भविष्यात वाढणार आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक व्हेईकलच्या वाढत्या मागणीनुसार इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधाही पेट्रोल पंपाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची तयारी ऑईल कंपन्यांनी केली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे रिटेल सेल्स विभागाचे व्यवस्थापक बी. सुंदर बाबु यांनी सांगितले. नागपूरमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची सुरूवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -