घरमुंबईमहालक्ष्मी मंदिराजवळील पार्किंगचे टेन्शन दूर, पालिकेकडून स्वतंत्र पदपथाची उभारणी

महालक्ष्मी मंदिराजवळील पार्किंगचे टेन्शन दूर, पालिकेकडून स्वतंत्र पदपथाची उभारणी

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या ‘कोस्टल रोड’ कामाच्या अंतर्गत निर्माण झालेल्या भराव क्षेत्रावर, भुलाभाई देसाई मार्ग सार्वजनिक वाहनतळ ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत (सहा मीटर रुंद आणि अंदाजे तीनशे मीटर लांब) पदपथ बांधण्यात आला आहे. या पदपथाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या पदपथामुळे महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांची वाहन पार्किंगची समस्या दूर होण्यास मदत होऊन मोठा दिलासा मिळणार आहे.

पदपथ लोकार्पण कार्यक्रमास मुंबई महापालिकेचे उपआयुक्त (परिमंडळ – 1) डॉ. संगीता हसनाळे, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडळकर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प) मंतय्या स्वामी, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, कार्यकारी अभियंता संजय पोळ, कोस्टल रोड प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ऋषिकेश पाटील, तसेच श्री महालक्ष्मी मंदीर न्यासाचे शेखर दांडेकर, विश्वस्त सुरेश डोंगरे, व्यवस्थापक नितीन कांबळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

या नवीन पदपथ उभारण्यापूर्वी, महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आपले वाहन मंदिराच्या नजीकच्या परिसरात रस्त्यावर, पदपथानजीक, आजूबाजूच्या सोसायटीच्या आवारात किंवा जेथे जागा मिळेल तेथे पार्क करावे लागत असे. त्यामुळे या भाविकांचे अर्धे लक्ष देवदर्शनाकडे तर अर्धे लक्ष वाहनाकडे लागलेले असे. रस्त्यावर, पदपथावर कुठेही वाहन पार्क केल्याने वाहतूक पोलीस त्यांचे वाहन उचलून आपल्या विभागात जमा करीत असत. जेव्हा भाविक मंदिरातून दर्शन घेऊन वाहन पार्क केलेल्या जागेवर येत असत तेव्हा त्यांना आपले वाहन जागेवर नसल्याचे आढळत असे. मग ते वाहन सोडविण्यासाठी त्यांची धावपळ होत असे.

- Advertisement -

पण आता या नवीन पदपथामुळे महालक्ष्मी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना आपले वाहन सार्वजनिक वाहनतळ येथे उभे करून, पदपथाद्वारे ते मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. तसेच वृद्ध नागरिक व इतर गरजू व्यक्ती बॅटरी ऑपरेटेड कारचा वापर करून मंदिरात जाऊ शकतात. हा पदपथ आपत्कालीन परिस्थितीत देखील वापर करणे शक्य होईल, अशा रीतीने बांधण्यात आला आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना, चालकांना आपले वाहन मंदिराच्या नजीकच्या परिसरात पार्क करून बिनधास्तपणे महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेणे, पूजाविधी करणे सुलभ होणार आहे.

हा नवीन अतिरिक्त पदपथ नवरात्रोत्सवापूर्वी बांधून पूर्ण करण्याचे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांनी दिले होते. त्यानुसार हा पदपथ भाविकांसाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुला करून देण्यात आला आहे.

नवीन पदपथाविषयी माहिती

मुंबई महापालिकेमार्फत बांधण्यात येत असलेल्या कोस्टल प्रकल्पाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या कामाच्या अंतर्गत भराव क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या जागेचा वापर करून महालक्ष्मी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना, मंदिरात सहजरित्या पोहोचता येईल, अशा रितीने मार्ग तयार करण्याचे निर्देश मंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. तसेच मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरालगतच पार्किंगची सोय करण्याबाबत देखील त्यांनी सूचना केल्या होत्या. या अनुषंगाने भुलाभाई देसाई मार्ग येथील अस्तित्वात असलेले सार्वजनिक वाहनतळ ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत सहा मीटर रुंद आणि अंदाजे तीनशे मीटर लांबीचा नवीन पदपथ बांधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -