घरमुंबईधरणातून मुंबईत पोहोचणार्‍या पाण्याची अचूक नोंद होणार

धरणातून मुंबईत पोहोचणार्‍या पाण्याची अचूक नोंद होणार

Subscribe

मुंबईत दरदिवशी धरणातून होणार्‍या पाणी पुरवठ्यापैकी 22 टक्के पाणी हे गळती आणि चोरीच्या माध्यमातून वाया जाते. परंतु ही आकडेवारी अंदाजितच आहे, कारण प्रत्यक्षात धरण ते जलशुद्धीकरण, जलशुद्धीकरण ते सेवाजलाशय आणि तेथून मुंबईकरांच्या नळापर्यंत पाणी पोहोचताना कुठे कुठे पाण्याची गळती होते, याचे आता अचूक मापन केले जाणार आहे. पाण्याचा पुरवठा करणार्‍या सर्व प्रमुख ठिकाणी आता महापालिकाकडून प्रवाह मापक बसवले जाणार आहेत. यासाठी 62 जलप्रवाह मापकांची खरेदी करण्यात येत आहेत.

मुंबईला सर्व धरणांमधून दरदिवशी 3 हजार 750 दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या मुंबईत 15 टक्के पाणी कपात लागू झाल्यामुळे कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होतो. परंतु प्रत्यक्षात धरणातून उचलल्या जाणार्‍या पाण्यापैकी प्रत्यक्ष मुंबईत पोहोचणारे पाणी तुलनेने कमी होते. त्यामुळे धरणापासून ते जलशुद्धीकरण केंद्र आणि पुढे सेवा जलाशयापर्यंत पुरवल्या जाणार्‍या पाण्याचे अचूक मापन होत नसल्याने प्रत्यक्षात मुंबईकरांच्या भांड्यात किती पाणी पडते याची नोंदच होत नाही.

- Advertisement -

मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत नेमलेले सल्लागार सुएज इन्व्हायरमेंट इंडिया प्रा.लि. या कंपनीने धरण तथा तलावातून येणार्‍या पाण्याचा प्रवाह मोजण्याच्या प्रणालीचा प्रयत्न केला. परंतु या प्रवाहमापन प्रणालीमध्ये त्रुटी असल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते. या अहवालात धरण तथा तलाव ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिन्या आणि महासंतूलन जलाशय ते सेवा जलाशयापर्यंतच्या जलवाहिन्यांमध्ये प्रवाहमापनासाठी कार्यरत असलेले एकमार्गी तसेच भिन्नदाबाचे प्रवाहमापक असल्याने ते बदलले जावेत, असे सुचवले होते. त्यानुसार महापालिकेने 62 जलप्रवाहमापक खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 96 कोटी रुपये खर्च करून जलप्रवाह मापक खरेदी करण्यास स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच हे प्रवाहमापक जलवाहिन्यांवर बसवले जाणार आहेत.

मुंबईमध्ये गळती व चोरीच्या माध्यमातून जे पाणी वाया जाते, त्या पाण्याचे अचूक मापन करून त्याचा शोध घेण्यासाठी जलप्रवाह मापक बसवले जात आहेत. यामुळे धरणातून मुंबईपर्यंत दरमजल करत आलेले पाणी कोणत्या टप्प्यावर कमी झालेले आहे, याची माहिती या मापकाद्वारे मिळणार आहे. जलप्रवाह मापक पॉईंट टू पॉईंट असे मुख्य जलवाहिन्यांवर बसवले जाणार आहेत.

- Advertisement -

छोट्या जलवाहिन्यांवरही मापक बसवणार
प्रायोगिक तत्वावर हे काम पूर्ण झाल्यावर छोट्या जलवाहिन्यांवरही हे जलप्रवाह मापक बसवले जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. विद्यमान पाणी पुरवठा व्यवस्थेत धरणापासून ते विविध पाणी पुरवठा विभागात देखभाल व नियंत्रणासाठी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या स्काडा प्रणाली कार्यान्वित आहेत. यासर्व स्काडा प्रणाालींचे एकाच स्काडा प्रणालीमध्ये संकलन केले जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -