घरमुंबईमुंबईत चोरांचा धुमाकूळ; 'फेडएक्स एक्सप्रेस' कुरिअरच्या कार्यालयासह ४ घरे फोडली

मुंबईत चोरांचा धुमाकूळ; ‘फेडएक्स एक्सप्रेस’ कुरिअरच्या कार्यालयासह ४ घरे फोडली

Subscribe

‘फेडएक्स एक्सप्रेस’ या आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीच्या परळ कार्यालयासह ४ ठिकाणी एकाच रात्री घरफोडीच्या घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या चारही घरफोडी प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या चारही गुन्ह्यात रोख रकमेसह लाखो रुपयांच्या ऐवजाची लूट झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून या अज्ञात लुटारूंचा शोध घेण्यात येत आहे.

परळ परिसरातील डॉ. बी.ए रोडवर असलेल्या अभिनंदन को.ऑप.हाऊसिंग सोसायटीच्या तळ मजल्यावर ‘फेडएक्स एक्सप्रेस’ या आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाचे व्यवस्थापक म्हणून कैझर शेख हे काम बघतात. २७ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी कामे आटोपून कार्यालयाला कुलूप लावून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फेडएक्स एक्स्प्रेस कंपनीत काम करणारे कर्मचारी संजय शिर्के हे कामावर आले असता त्यांना कार्यालयाचे शटर अर्धवट उघडे दिसले. त्यांनी आत जाऊन बघितले असता, आतील सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. शिर्के यांनी व्यवस्थापक कैझर यांना या घटनेची कल्पना फोनवर दिली. कैझर यांनी ताबडतोब कार्यालयात धाव घेऊन भोईवाडा पोलिसांना कळवले. भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता अज्ञात लुटारूंनी शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील लॉकर मधून सुमारे चार लाख रुपयांची रोकड लुटल्याचे उघड झाले.

- Advertisement -
हे वाचा – लग्नात मटना ऐवजी वाढले चिकन; मांडवात झाला तुफान राडा

त्याच दरम्यान लुटारूंनी जवळच असलेल्या मुश्ताक अली अन्सारी यांच्या गॅरेजचे कुलुप तोडून लॉकर मधून ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. लुटारू एवढ्यावर न थांबता त्यांनी दादर हिंदमाता येथील व्ही.एल. पेडणेकर मार्ग या ठिकाणी असलेल्या रतन मेनोर या इमारतीत राहणारे व्यावसायिक दीपक नायडू यांच्या ३८ आणि २४ क्रमांकाच्या दोन खोल्या आहेत. नायडू हे कुटुंबासह खोली क्रमांक ३८ मध्ये झोपलेले असताना या लुटारूंनी त्यांच्या २४ क्रमांकाच्या खोलीचे कुलूप तोडून घरातील कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. कपाट उघडले जात नसल्यामुळे लुटारूंना तेथून  रिकाम्या हाताने जावे लागले. नायडू यांच्या खोलीतून रिकामे हाती जावे लागल्यामुळे या लुटारूंनी त्याच परिसरातील कमल निवास या इमारतीला लक्ष्य केले. कमल निवासच्या पहिल्या मजल्यावर राहणारे रमेश मयेकर यांच्या बंद असलेल्या खोलीचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ६७ हजार रूपयांचा ऐवज लुटून पोबारा केला.

या चारही घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या असून लुटारींनी एकाच रात्रीतून या चार ठिकाणी लूट केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. या चारही घटनेत एकाच लुटारू टोळीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून परिसरात लावण्यात आलेल्या सीसीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत असून त्याच्या मार्फत या लुटारूंचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. एकाच रात्री घडलेल्या या चारही घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तसेच दुकानदारांमध्ये भीतीचे वातावारण पसरले आहे.


हे देखील वाचा – लवकरच सैन्याला मिळणार AK-203 बंदूका 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -