घरमुंबईदक्षिण मुंबईत होणार 'पुल'कोंडी; नव्या वर्षात ट्रॅफिक सतावणार!

दक्षिण मुंबईत होणार ‘पुल’कोंडी; नव्या वर्षात ट्रॅफिक सतावणार!

Subscribe

दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे पुलाच्या जागी नव्याने दोन पुल बांधणे, तसेच लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील डिलाईल पुलाच्या महापालिकेच्या हद्दीतील पुलाच्या बांधकामांना स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली आहे. कोणत्याही चर्चेविना या तिन्ही पुलांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. स्थायी समितीच्या सभेत या पुलांचे प्रस्ताव अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर करत पुलांच्या कामांचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भूमिपुजन होऊन महिन्याभरात पुलांच्या कामांना सुरुवात होणार आहे.

पुलाचं वयमान झालं १०० वर्ष!

महालक्ष्मी येथील रेल्वे पुलाचे आयुर्मान १०० वर्षे होत आल्याने आता हे धोकादायक पूल पाडण्याची घटिका समिप आली आहे. महालक्ष्मी रेल्वे पूल धोकादायक झाल्याने या पुलाच्या जागी वरळीतील केशवराव खाड्ये मार्गावरुन हाजीअलीच्या दिशेला आणि डॉ. ई.मोझेस रोडवर सेनापती बापट मार्ग जंक्शनपर्यंत दोन पुलांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी विविध करांसह ७४५कोटी रुपये खर्च केले जाणार असून या कामाांसाठी गुजरातमधील कंत्राटदार असलेल्या अॅप्को-सीआरएफजी या संयुक्त भागीदारातील कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. परंतु या प्रस्तावावर कोणत्याही सदस्यांनी चर्चा न केल्यामुळे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्ताव संमत केला.

- Advertisement -

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक पूल दीड वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करून पाडण्यात आल्यानतंर याठिकाणी रेल्वेच्या हद्दीतील पुलाच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल १३८ कोटी रुपये खर्च केले जाणार असून जीएचव्ही इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या हद्दीतील या पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला सादर केला असता, कोणत्याही चर्चेविना या प्रस्तावाला अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजुरी दिली.

मेट्रोच्या कामांमुळेही होतेय कोंडी

लोअरपरळ येथील डिलाईल पुल बंद असून रेल्वेच्या माध्यमातून सध्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. तर महालक्ष्मी पूल सुरु असून भविष्यात या ठिकाणी दोन पुलांची उभारणी केली जात असल्याने दक्षिण मुंबईत सध्या मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. आता पुलांच्या बांधकामांची भर पडणार असल्याने या नवीन वर्षांत दक्षिण मुंबईतील पुल कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे. या पुलांचे भूमिपूजन येत्या काही दिवसांमध्ये आटोपले जाणार असल्याचेही पूल विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -