घरमुंबईभाडेकपातीसोबत बेस्टचे बंद मार्ग सुरु करा

भाडेकपातीसोबत बेस्टचे बंद मार्ग सुरु करा

Subscribe

आतापर्यंत ९५ बेस्ट मार्ग बंद,दीड वर्षात 900 गाड्या डेपोतच ,बेस्ट आणि शिवसेनेने खेळ मांडला

सर्वसामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टने एकीकडे प्रवासी भाड्यात मोठ्या प्रमाणात कपात करून प्रवाशांना सुखद धक्का दिला, तर दुसरीकडे एकूण ५०५ बेस्ट मार्गांपैकी ९५ बेस्ट मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे प्रवाशांसोबत शाळकरी मुलांना मोठा फटका बसला आहे. भाडे कपात करून ५ रुपये कमी करू नका, तर बंद केलेले मार्ग पुन्हा सुरु करा, अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे. बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ९०० गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. भाडेकपातीचे गाजर दाखवून बेस्ट प्रशासन आणि पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेेने मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळ मांडला आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करत आहेत.

बेस्ट आणि मुंबई महानगरपालिकाने बेस्टच्या भाडे कपातीच्या निर्णय घेऊन, मुंबईकरांचा बेस्ट प्रवास आणखी स्वस्त केला असला, तरी मुंबईकरांना त्यांचा काही फायदा होत नाही, अशी कबुली अनेक मुंंबईकरांनी दै. ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली आहे. प्रवाशांना बेस्ट भाडे कमी करण्यापेक्षा बंद केलेले बेस्ट मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. जोगेश्वरी पूर्व परिसरातील अनेक बेस्ट मार्ग बंद झाले आहेत. त्याचा फटका शाळकरी मुलांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मुलांना शाळेत जाण्याकरता खासगी वाहनाची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे सामान्य मुंंबईकरांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. काही शाळेकरी मुले चक्क पायपीट करत शाळा गाठताना दिसत आहेत.

- Advertisement -

जोगेश्वरी पूर्वेला अरविंद गंडभीर हायस्कूल, इस्माईल कॉलेज, सुरजबा हायस्कूल, जे.ई.एस हायस्कूल आणि निकुंज हायस्कूल आहेत. मोठ्या प्रणात विद्यार्थी या शाळेत जातात. मात्र मागील दोन महिन्यांपासून बेस्ट मार्ग बंद केले आहेत. परिणामी शाळकरी मुलांना शाळेत पोहचण्याकरिता पायपीट करावी लागत आहे. अशी माहिती जोगेश्वरी पूर्वेला राहणार्‍या वैशाली श्रीधरनकर यांनी दिली.

दीड वर्षात 900 गाड्या कमी
शहरासह उपनगरात बेस्टचे 505 बेस्ट मार्ग सुरू होते. मात्र मागील दीड वर्षात 505 पैकी 95 बेस्ट मार्ग बंद करण्यात आले आहेत. यांचे मुख्य कारण म्हणजे बेस्ट प्रशासनाकडे पुरेशा गाड्या नाहीत. सध्या बेस्टकडे एकूण 3 हजार 200 बसेस आहेत. त्यामुळे या 505 मार्गावर पुरेशा गाड्या चालविणे शक्य होत नाही. पूर्वी बेस्टकडे 4 हजार 200 बस गाड्यांच्या ताफा होता. मात्र ढिसाळ नियोजनामुळे यातील ९०० गाड्या मागील वर्षात कमी झाल्या आहेत.

- Advertisement -

प्रवाशांच्या तक्रारीला कोणी वाली नाही
ऐन पावसाळ्यात आणि सुरू झालेल्या शाळा-कॉलेजेसच्या वेळेत मुंबई महापालिकेने नाल्यांवरील रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजेसना जाणार्‍या विद्यार्थी पालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामाला अद्यापही सुरुवात केलेली नाही. तरीही पालिकेने बेस्ट प्रशासनाला पत्रव्यवहार करून जोगेश्वरी (पूर्व) मजासवाडी ते सद्भक्ती बस क्रमांक २६४ बंद करण्यास लावली आहे. बस बंद असल्याने शालेय विद्यार्थी, कामगार वर्ग यांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंबधीत तक्रारी करुनसुध्दा बेस्ट आणि महानगर पालिका प्रशासन प्रवांशाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहे.

505 बेस्ट मार्ग सुरळीत सुरू ठेवण्यासाठी बेस्टला तब्बल 5 हजार बसेसची गरज आहेत. मात्र मागील दीड वर्षात बेस्ट मधील 900 बसेस कमी झाल्या आहेत. त्यामुळे पुरेशा बसेस नसल्यामुळे काही बेस्ट मार्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र आता 400 नवीन बसेस बेस्टच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. त्यानंतर बंद असलेले बेस्ट मार्ग सुरू करण्यात येतील. तोपर्यंत नागरिकांनी बेस्टला सहकार्य करावे.
– सुनील गणाचार्य, वरिष्ठ सदस्य, बेस्ट समिती

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -