घरमुंबईवसई - विरार महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार

वसई – विरार महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार

Subscribe

मोर्चेबांधणीच्या बैठकीत संकेत

जून महिन्यात होऊ घातलेल्या वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने मोर्चेंबांधणी सुुरु केली आहे. महापालिकेच्या सर्वच्या सर्व 115 जागांवर उमेदवार उभे करायचे असून त्यादृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना नगरविकास मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वसईत कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिल्या. त्यामुळे शिवसेना आगामी निवडणुक स्वबळावर लढणार अशीच माहिती हाती लागली आहे.

महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीनिमित्त वसईत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक रविवारी झाली. त्या बैठकीला एकनाथ शिंदे आणि संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी मार्गदर्शन केले. पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, गटनेत्या किरण चेंदवणकर, उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, तालुका प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, मिलिंद खानोलकर, प्रदीप शर्मा, सायमन मार्टीन, शिरीष चव्हाण यांच्यासह वसई विरारमधील प्रमुख पदाधिकारी हजर होते. बैठकीतील वृत्त बाहेर जाऊ नये यासाठी पदाधिकार्‍यांना मोबाईलवर रेकॉर्डींग न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

वसई विरार शहरात अनेक गंभीर प्रश्न आहेत. पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे वसईवर लक्ष आहे. निवडणूक जिंकायची आहे. आपण सर्व जागा लढत असून उमेदवारांची चाचपणी सुरु करा, असे शिंदे यांनी बैठकीत बोलताना सांगितले. काही पदाधिकार्‍यांनी महापालिकेत खमक्या आयुक्त द्या, अशी मागणी केली असता शिंदे यांनी लवकरच आयुक्तांची नियुक्ती होईल, असे सांगितले.

दरम्यान, 2018 साली झालेली पालघर लोकसभेची पोटनिवडणूक, 2019 मधील लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बविआवर टीका केली होती. आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही निवडणुकीत शिवसेनेलाच लक्ष्य केले होते. त्यामुळे ठाकरे-ठाकूर यांच्यातील संबंध पराकोटीचे बिघडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाआघाडीचे सरकार आहे. त्यात वसई विरार महापालिकेत सत्ताधारी असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी पाठिंबा दिला आहे. पण, शिवसेना आणि बविआमधील संबंध पाहता महापालिका निवडणुकीत महाआघाडी होईल असे चित्र दिसत नाही. महत्वाचे म्हणजे आमदार हितेंद्र ठाकूर लोकसभा आणि विधानसभेत मित्र पक्षांची मदत घेत असले तरी महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांना सत्तेत वाटा देत नाहीत हा इतिहास आहे.

- Advertisement -

माजी जिल्हाप्रमुखांची अशीही नाराजी
जिल्हाप्रमुखपद गेल्यानंतर संघटनेने दुरावा केल्याची व्यथा माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. स्थानिकांना विश्वासात न घेता बाहेरचा उमेदवार दिला जातो. त्यामुळे पराभव होतो. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात पराभव का झाला याचे आत्मचिंतन करायला हवे, असे चव्हाण यांनी बोलून दाखवले. जुन्या पदाधिकार्‍यांना डावलले जाते याकडेही चव्हाण यांनी यावेळी लक्ष वेधले.

विजय पाटील प्रकरणाची चर्चाच नाही
गेल्या आठवड्यात जुचंद्र गावात एका कार्यक्रमात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेचे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार विजय पाटील यांना खडे बोल सुनावले होते. पाटील यांना स्टेजवरच धारेवर धरले होते. याप्रकरणाची सध्या वसईत जोरदार चर्चा सुुरु आहे. ठाकूरांनी आमच्या आगरी नेत्याला दमदाटी केल्याचा आरोप करीत आगरी सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी जुचंद्र गावात मोर्चाही काढला होता. त्यामुळे याप्रकरणाची चर्चा बैठकीत होईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र याविषयाचा एकही नेता अथवा पदाधिकार्‍याने उल्लेखही केला नाही.

वसई – विरार महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -