घरमुंबईवाशी मनपा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे

वाशी मनपा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे

Subscribe

निलंबित डॉक्टरांच्या समर्थनार्थ मुख्य डॉक्टरांचे राजीनामे

विकी इंगळे मृत्यू प्रकरणात मनपा आयुक्त एन. रामास्वामी यांनी राजकीय दबावापोटी कोणतीही चौकशी समिती न नेमता वाशी मनपा रुग्णालयातील डॉ.शरीफ तडवी व डॉ.प्रभा सावंत यांना निलंबित करत डॉ.प्रशांत जवादे (मुख्य वैद्यकीय अधीक्षक) आणि डॉ.किरण वैराळ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) यांची विभागीय चौकशी लावल्याने इतर डॉक्टरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जे तडवी आणि सावंत यांच्या बरोबर झाले ते भविष्यात आमच्या बरोबरही होऊ शकते, या भीतीने आणि तडवी व सावंत यांना पाठिंबा देण्यासाठी रुग्णालयातील मुख्य डॉक्टरांनी अतिरिक्त आयुक्तांकडे राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून वाशी मनपा रुग्णालय नवख्या डॉक्टरांवर चालवले जात आहे. त्यामुळे भविष्यात जर पुन्हा विकी इंगळे सारखी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे परिवहन सदस्य राजेन्द्र इंगळे यांच्या मुलाचा मृत्यू झाला असता या मृत्यूला जबाबदार असणार्‍या डॉक्टरांवर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी राजेंद्र इंगळे यांनी शुक्रवारपासून आंदोलनाचे रणशिंग फुंकले. यावरून राजकीय वातावरण तापले असता मनपा आयुक्त एन.रामस्वामी यांनी तडकाफडकी वैद्यकशास्त्र तज्ज्ञ विभाग प्रमुख प्रभा सावंत आणि वैद्यकशास्त्र तज्ज्ञ शरीफ तडवी यांना निलंबित केले. तसेच वैद्यकीय अधीक्षक प्रशांत जवादे आणि वैद्यकीय अधिकारी किरण वैराळ यांच्या चौकशी साठी सर जे.जे. रुग्णालय मुंबईचे अधिष्ठाता यांना चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यावरही इंगळे यांचे समाधान झाले नसता त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे राजकीय आणि प्रशासन वर्गात खळबळ माजली. त्यामुळे रविवारी दुपारी बेमुदत उपोषणाला बसलेल्या इंगळे कुटुंबियांनी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडले. मात्र दोन दिवसात मनपा प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आयुक्त एन. रामस्वामी यांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा इंगळे कुटूंबियांनी यावेळी दिला. मात्र याच दरम्यान वाशी मनपा रुग्णालयातही खळबळ माजली.

- Advertisement -

इंगळे प्रकरणात आयुक्तांनी अगोदर एक चौकशी समिती गठीत करायला हवी होती. त्या समितीच्या अहवालानंतरच कारवाई करायली हवी होती, असे मत काही स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केले. तडवी व सावंत हे बळीचा बकरा बनवले गेल्याने भविष्यात आमच्यावरही अशी वेळ येऊ शकते.त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकशास्त्र तज्ज्ञ डॉ.सचिन गंगावणे, डॉ. देविदास चव्हाण, डॉ.प्रमोद चव्हाण आणि डॉ.गीतांजली तगडू यांनीही अतिरिक्त आयुक्तांकडे राजीनामे दिले आहेत. राजीनामे दिल्यावर हे सर्व डॉक्टर सुट्टीवर गेल्याने रुग्णालयाची जबाबदारी केवळ एका महिला डॉक्टरवर येऊन ठेपली आहे. रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक ते वैद्यकशास्त्र तज्ज्ञ सर्वच सुट्टीवर असल्याने सध्या स्थितीत रुग्णालयाचा कारभार राम भरोसे सुरू आहे. कोणतही मुख्य डॉक्टर रुग्णालयात हजर नसल्याने आम्ही कामे कशी करायची व कसा निर्णय घ्यायचा, असा प्रश्न सध्या नवख्या डॉक्टरांना पडला आहे. त्यामुळे पुन्हा जर विकी इंगळे मृत्यूप्रकरखा प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न इतर कर्मचार्‍यांना पडला.

मनपाच्या वाशी रुग्णालयातील वैद्यकशास्त्र तज्ज्ञ डॉक्टरांनी राजीनामे दिले असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन तीन डॉक्टरांनी राजीनामे दिले असून सचिन गंगावणे यांनी राजीनामा दिलेला नाही.
– दयानंद कटके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी

- Advertisement -

वाशी मनपा रुग्णालयातील ज्या डॉक्टरांवर कारवाई झाली ती अन्यायकारक असल्याचे समजले आहे.निलंबित डॉक्टरांच्या समर्थनार्थ इतर डॉक्टरांनी राजीनामे दिले असून आमचाही त्यांना पाठिंबा आहे. जर त्यांना न्याय मिळाला नाही तर सर्व सफाई कामगार सुट्टीवर जातील.
-मंगेश लाड, सचिव, समता समाज कामगार संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -