घरमुंबईमाहुलवासीय करणार सरकारविरोधात मतदान

माहुलवासीय करणार सरकारविरोधात मतदान

Subscribe

कोर्टाच्या आदेशानंतरही स्थलांतराबाबत दुर्लक्ष

स्वत:च्या हक्काच्या घरासाठी दीड वर्षांपासून विद्याविहार येथील तानसा जलवाहिनीलगत आंदोलनाला बसलेल्या माहुलवासीयांच्या प्रश्नाकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार याकडे कानाडोळा करत असल्याने माहुलवासीयांमध्ये सरकारविरोधात तीव्र रोष आहे. आमच्या आयुष्याच्या प्रश्नाकडे सरकारकडून दुर्लक्ष केल्याने आम्ही सरकारविरोधात मतदान करणार असल्याची भूमिका माहुलवासीयांनी ‘आपलं महानगर’कडे व्यक्त केली.

तानसा जलवाहिनीलगत असलेल्या आमच्या झोपड्या हटवून आम्हाला माहुल येथे स्थलांतर करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आम्ही यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांची भेट घेतली, पण सत्ताधारी असलेल्या भाजपने आमच्या समस्येकडे नेहमीच दुर्लक्ष केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही किरीट सोमय्या यांना भेटलो असता त्यांनीही आमच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना पाच वर्षांत आम्ही वारंवार आमचा मुद्दा सरकार दरबारी उपस्थित केला, पण त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. दीड वर्षांपासून आम्ही आंदोलन करत आहोत, पण सरकारने त्याची दखल घेतली नाही. आयआयटी मुंबई व हरित लवादाने माहुल ही जागा राहण्यायोग्य नसल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर न्यायालयाने येथील नागरिकांना अन्यत्र हलवण्यात यावे, असे आदेश सरकारला दिले होते. तसेच न्यायालयाने माहुलवासीयांना दरमहा 15 हजार भाडे देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सरकारने न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले आहे.

- Advertisement -

सरकारने आमच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत आम्हाला वार्‍यावर सोडले आहे. माहुलमधील प्रदूषणामुळे येथील नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषणामुळे येथील भावी पिढीही आजाराने ग्रासले आहेत. अनेकजण त्वचा व अन्य रोगाने ग्रस्त आहेत. याबाबत वारंवार सरकारकडे पाठपुरावा करूनही त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केल्यामुळे आमचे आयुष्य धोक्यात आले आहे, अशी भावना व्यक्त करत माहुलमधील नागरिकांनी सरकारला निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय माहुलमधील नागरिकांनी घेतला आहे, अशी माहिती माहुलमधील नागरिक रेखा घाडगे यांनी दिली. सरकारने जरी आमच्याकडे दुर्लक्ष केले असले तरी शिवसेना व आप यांसारख्या काही राजकीय पक्षांनी आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळे आम्ही सरकारविरोधात मतदान करणार नसलो तरी आम्ही नोटाचा वापर करणार नसल्याचेही घाडगे यांनी सांगितले. माहुलमध्ये तब्बल पाच हजारपेक्षा अधिक कुटुंबे आहेत. त्यांनी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने याचा फटका ईशान्य मुंबईतील उमेदवार मनोज कोटक यांना बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

माहुलमधील नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत सरकार त्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सरकारविरोधात मतदान न करून त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र, कोणत्या पक्षाला मतदान करायचे व नोटा वापरण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत आम्ही लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू –– बिलाल खान, सदस्य, घर बचाव समिती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -